पुणे- पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेत गेल्या ८ वर्षांपासून कार्यरत असलेला लाडका श्वान लिओचा आजारपणाने मृत्यू झाला. लिओने मेफेड्रोनसह अमलीपदार्थांचा साठा पकडून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. पोलीस दलाने शोकाकूल वातावरणात सलामी गार्डने लिओला अखेरची मानवंदना दिली.
लॅब्रोडोर जातीच्या लिओचा जन्म जुलै २०१६ मध्ये झाला. तो ४ महिन्यांचा असताना सप्टेंबर २०१६ मध्ये पुणे पोलीस दलातील श्वानपथकात त्याचा समावेश करण्यात आला. त्यानंतर त्याला प्रशिक्षकाकडून (हँडलर) खडतर प्रशिक्षण देण्यात आले. श्वान प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेताना त्याला अमली पदार्थ हुडकणे, कवायतीचे प्रशिक्षण देण्यात आले होते. श्वान प्रशिक्षण केंद्रातील खडतर प्रशिक्षण पूर्ण करण्यात आल्यानंतर त्याचा समावेश गुन्हे शाखेतील अमली पदार्थविरोधी पथकात करण्यात आला होता. सोलापूर रस्त्यावरील लोणी काळभोरमधील शेतात गांजाची लागवड करण्यात आली होती. या शेतातून ७० किलो गांजा जप्त करण्यात आला होता. या कारवाईत लिओ सहभागी झाला होता.