कराची – पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सची (पीआयए)विमाने १० जानेवारीपासून युरोपमध्ये पुन्हा उड्डाण करणार आहे.युरोपियन युनियनच्या अधिकाऱ्यांनी पीआयएच्या विमानसेवेवरील ४ वर्षांची बंदी उठवल्यानंतर पीआयएने एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली.
वैमानिक परवाना घोटाळ्याच्या केंद्रस्थानी असलेल्या पीआयएने म्हटले की,पीआयएचे विमान १० जानेवारीपासून इस्लामाबादहून पॅरिसला जाणार आहे.सुरुवातीला आठवड्यातून शुक्रवारी आणि रविवारी ही विमानसेवा सुरु राहणार आहे.त्यानंतर या विमानसेवेची व्याप्ती वाढवली जाणार आहे.
पीआयएला जून २०२० मध्ये युरोपमध्ये उड्डाण करण्यापासून रोखण्यात आले होते. कराचीत पीआयएचे विमान कोसळले होते. त्यात १००हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.ही घटना वैमानिक आणि हवाई वाहतूक नियंत्रकांच्या चुकांमुळे घडल्याचे उघड झाले आणि त्यानंतर वैमानिकांचे एक तृतीयांश परवाने बनावट किंवा संशयास्पद असल्याचा आरोप करण्यात आला होता.