मुंबई- पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील ओगदे गावाजवळ गारगाई नदीवर धरण बांधण्याचे प्रस्तावित आहे.याच धरणातील ४०९ दशलक्ष लिटर पाणी मुंबईकरांना मिळणार आहे. आतापर्यंत रखडलेल्या या प्रकल्पाला वेग येणार आहे कारण त्यासाठी सरकारची सर्व प्रकारची आवश्यक परवानगी मिळाली असून लवकरच या प्रकल्पात बाधित होणार्या झाडांचीही गणना केली जाणार आहे.
प्रस्तावित गारगाई धरण हे ६९ मीटर उंचीचे आणि ९७२ मीटर लांबीचे असणार आहे. तिथे मनोराही उभारला जाणार आहे.मुंबईकरांना पाणी देण्यासाठी गारगाई ते मोडकसागर जलाशयाच्या दरम्यान दोन किलोमीटर लांबीचा बोगदा बांधला जाणार आहे. प्रकल्पामुळे बाधित रहिवाशांचे पुनर्वसनही केले जाईल. यासंदर्भात सखोल अभ्यास करूनच या प्रकल्पाचे काम हाती घेतले जाणार आहे. लवकरच या प्रकल्पात बाधित होणार्या झाडांची ही गणना करण्याचे काम सुरू होणार
आहे. सध्या मुंबईला सात धरणांतून पाणीपुरवठा केला जातो. मात्र वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत हे पाणी पुरेसे नाही. त्यामुळे आता गारगाईच्या ४०९ दशलक्ष लिटर पाण्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलास मिळणार आहे.