पालकांच्या खिशाला बसणार झळ, शालेय बस शुल्कात 18 टक्क्यांची वाढ

School BUS Fare Hike: एकीकडे राज्यभरात एसटीचा प्रवास महागला असताना, आता शालेय बस प्रवास शुल्कात देखील वाढ होणार आहे. शालेय बस मालक संघटनेने येत्या शैक्षणिक वर्षासाठी बस शुल्कात 18% वाढ करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षात पालकांच्या खिश्याला या दरवाढीची झळ बसणार आहे.

शालेय बस मालक संघटनेने शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने आता पालकांना विद्यार्थ्यांच्या प्रवासासाटी अतिरिक्त पैसे खर्च करावे लागणार आहेत. वाढत्या संचालन खर्चाचे कारण देत हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जाते.

तसेच, सरकार अनधिकृत शालेय वाहतूक सेवांवर कठोर कारवाई करत असेल, तर या दरवाढीचा पुनर्विचार केला जाईल, असेही संघटनेने स्पष्ट केले आहे. संघटनेचे अध्यक्ष अनिल गर्ग म्हणाले की, “जर सरकार बेकायदेशीर शालेय वाहतूक सेवांवर पूर्णतः बंदी घालत असेल, तर आम्ही भाडेवाढीच्या निर्णयाचा पुनर्विचार करू.

बस आणि सुट्या भागांच्या किंमती वाढणे, रस्त्यांच्या कामामुळे वाहनांचा देखभाल खर्च वाढणे, तसेच चालक आणि कर्मचाऱ्यांचे वेतन वाढणे यामुळे खर्च वाढला आहे. याशिवाय, GPS आणि CCTV कॅमेऱ्यांसारख्या सुरक्षा उपकरणांच्या सक्तीमुळे अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे. पार्किंग शुल्कात मोठी वाढ आणि RTO दंडामुळे देखील बस चालकांना अतिरिक्त खर्च करावा लागत आहे. त्यामुळे बस शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे संघटनेकडून सांगण्यात येत आहे.