इस्लामाबाद – पाकिस्तानच्या अफगाणिस्तान सीमेनजिक असलेल्या खैबर पख्तूनख्वा येथील कुर्रम जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून शिया व सुन्नी मुस्लीमांमध्ये सुरु असलेल्या संघर्षात ८० पेक्षा अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला असून दीडशेहून अधिक जण जखमी झाले आहेत. या दोन्ही गटांनी युद्धविराम घोषित केला असला तरी या भागात तणावपूर्ण शांतता आहे.
कुर्रम जिल्ह्यातील अलीजई आणि बागान कबिल्यां मध्ये गेल्या काही आठवड्यांपासून संघर्ष सुरु आहे.
२१ नोव्हेंबर रोजी सुन्नी मुस्लिमांच्या एका गटाने पोलीस संरक्षणात जात असलेल्या शिया मुस्लिमांच्या गटावर हल्ला केला. या हल्ल्यात ४० हून अधिक लोकांना जीव गमवावा लागला. मृतांमध्ये मोठ्या प्रमाणावर महिला व लहान मुलांचा समावेश होता. त्यानंतर दंगे अधिकच भडकले. यामध्ये एकूण ८० जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत मिळालेल्या आकडेवारीवरुन शिया गटाच्या ६६ जणांचा तर सुन्नी गटाच्या १६ लोकांचा मृत्यू झाला आहे. या दंगलीनंतर ३०० कुटुंबे कुर्रम सोडून हंगू व पेशावरला स्थलांतरीत झाले आहेत. पाकिस्तान सरकारने दोन्ही गटात समझौता करत युद्धविराम घोषित केला. हे दोन्ही आदिवासी समूह असून त्यांच्यात जमीनीवरुन विवाद सुरु आहे. सरकारने त्यांच्यात समझौता केला असून परस्परांच्या ताब्यात असलेल्या जखमी लोकांना माघारी पाठवण्याचे आवाहन केले आहे.