बिकानेर – राजस्थानातील बिकानेर जिल्ह्यात पाकिस्तान सीमेवरील नीळकंठ चौकीजवळ २ ऑक्टोबर रोजी ड्रोनद्वारे हेरॉईन टाकल्याप्रकरणी अटक केलेल्या तस्करांच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. संयुक्त तपास यंत्रणांनी या तस्करांच्या केलेल्या चौकशीत हेरॉईन टाकण्यासाठी पाकिस्तानातील तस्कराने ठिकाण ठरवले होते आणि यासाठी हवालाद्वारे दुबईतून पैसे हस्तांतरित केल्याचे उघड झाले आहे.
बिकानेरच्या खाजुवाला सीमा भागात नीलकंठ पोस्टजवळ सीमा सुरक्षा दलाने सुमारे ११ कोटी रुपयांचे ड्रोन आणि २ किलो हेरॉईन जप्त केले होते. याप्रकरणी पोलीस आणि सीमा सुरक्षा दलाने तस्करांना अटक केली होती. त्यांची चौकशी सुरू आहे.
पंजाबमधील मुख्य तस्कराने अहमद या पाकिस्तानी तस्कराशी हेरॉईन तस्करीचा सौदा केला होता. या कामासाठी त्याने नुकतीच बलदेव सिंग यांची रोहतक तुरुंगातून कॅरिअर म्हणून सुटका केली होती.दीड लाख रुपयांत हा सौदा ठरला होता. अहमदने दुबईतून हवालाद्वारे बलदेवने नमूद केलेल्या बँक खात्यात एक लाख रुपये ट्रान्सफर केले होते, मात्र सीमा सुरक्षा दलाच्या सतर्कतेमुळे तस्करांचा उद्देश सफल झाला नाही.