कोल्हापूर- पश्चिम महाराष्ट्रातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यातील हरोली येथे कार्यान्वित झाला आहे. तीन मेगावॉट क्षमतेचा हा सौरऊर्जा प्रकल्प शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करणार आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत चालवण्यात येणाऱ्या या प्रकल्पामुळे हरोली आणि जांभळी या दोन गावांतील ७९० शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत राज्यात १६,००० मेगावॉट क्षमतेच्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पांची उभारणी सुरू आहे.कोल्हापूर जिल्ह्यात ५४ ठिकाणी एकूण क्षमता १७० मेगावॉट व सांगली जिल्ह्यात ३४ ठिकाणी एकूण क्षमता २०७ मेगावॉट क्षमता असलेले सौर प्रकल्प प्रस्तावित आहेत. या दोन्ही जिल्ह्यातील प्रकल्पांची एकत्रित क्षमता ३७७ मेगावॉट आहे. या प्रकल्पांपैकी अनेक प्रकल्प प्रगतीपथावर असून प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ७५ कृषी वाहीन्यांवरील शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज मिळणार आहे.कमी दाबाच्या तक्रारीदेखील दूर होणार आहेत.तसेच या प्रकल्पासाठी ग्रामपंचायतींना पाच लाख रुपये वार्षिक अनुदान मिळणार आहे.या योजनेमुळे स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीसही चालना मिळणार आहे.