पडवे-माजगाव येथे मायनिंग करणाऱ्यांवर कारवाई करा! परशुराम उपरकर यांची मागणी

सिंधुदुर्ग- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पडवे-माजगाव येथे इकोसेन्सिटिव्ह भागात मायनिंग करणाऱ्यांची सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी माजी आमदार परशुराम उपरकर यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांकडे केली आहे. याबाबत त्यांनी निवेदनदेखील प्रसिध्द केले आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पडवे-माजगाव हे इकोसेन्सिटिव्ह झोनमध्ये येणारे गाव आहे. या गावात मोठ्या प्रमाणात अनधिकृत लोह खनिज उत्खनन केले जाते. लोह खनिज उत्खनन करून सुमारे १ ते दीड हजार डंपर वाहतूक दोडामार्ग तालुक्यातील मोरगाव येथील गावात डम्प केले जाते. यासाठी कोणत्या वाहतूक ट्रेडरचे पास वापरले जातात त्याची चौकशी करून माहिती घ्यावी. दोडामार्ग तालुक्यातील मोरगाव येथे खनिज डम्प केल्या जाणाऱ्या ठिकाणी जमीन तात्पुरती बिनशेती झाली आहे, असे तहसीलदार यांनी चर्चेतून सांगितले. मात्र खरोखर तसे आहे का, याची तपासणी करावी. दोडामार्ग तालुक्यातील मोरगाव या गावातून लोह खनिज वाहतूक करण्यासाठी कोणत्या कंपनीचा परवाना दिला होता, याची चौकशी करून दंडाची कारवाई करावी.
माजी आमदार परशुराम उपरकर म्हणाले की, पडवे-माजगाव येथे इको सेन्सिटिव्ह मध्ये मायनिंग उत्खननाबाबत वारंवार महसूल आणि खनिकर्म विभागाकडे तक्रार करण्यात आली आहे. मात्र तरीही त्या ठिकाणी अनधिकृत मायनिंग व वाहतूक सुरूच आहे. याबाबत कोणीच दखल घेतली नाही. त्यामुळे या प्रकाराची गंभीर दखल घेऊन सखोल चौकशी करावी.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top