पगार, बोनस आणि वाईट वागणूक चालकानेच बस पेटवून प्राण घेतले

पुणे- पुण्यातील हिंजवडीत दोन दिवसांपूर्वी व्योमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांना नेणाऱ्या मिनीबसला भीषण आग लागली आणि त्यात चार कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला होता. या भीषण दुर्घटनेचा तपास करताना धक्कादायक माहिती उघड झाली. अनेक वर्षे ही गाडी चालविणाऱ्या चालकानेच गाडीतील 12 कर्मचाऱ्यांना ठार मारण्याचा कट रचला होता. मालकाने एक-दोन महिन्यांचा पगार थकविला, दिवाळी बोनस दिला नाही, त्याला जेवणावरून उठवले, वाईट वागणूक दिली या सर्व गोष्टींचा राग येऊन त्याने हे कृत्य केले. आरोपी चालक जनार्दन हंबर्डीकरने गुन्ह्याची कबुली दिल्याचे हिंजवडी पोलिसांनी सांगितले.
पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड म्हणाले की, व्योम ग्राफिक्स कंपनीच्या मिनीबसला चालक जनार्दन हंबर्डीकरने कट रचून आग लावली. आरोपीने कंपनीतून आदल्या दिवशी बेंझिन नावाचे केमिकल गाडीत आणून ठेवले होते. दुसऱ्या दिवशी त्याने चालकाच्या सीटच्या खाली केमिकलची बाटली आणि टोनर पुसण्यासाठी लागणाऱ्या चिंध्याही ठेवल्या होत्या. हिंजवडीजवळ आल्यावर त्याने चिंध्या काडेपेटीने पेटवल्या. केमिकलमुळे बसमध्ये आगीचा भडका उडाला. आग लागली तेव्हा मिनीबसमध्ये 12 कर्मचारी होते. आग लागताच पुढे बसलेल्या दोन कर्मचाऱ्यांनी दरवाजामधून उडी मारली. सहा जणांनी आगीच्या लोळातून उड्या मारून जीव वाचवला. बसच्या मागच्या बाजूला बसलेल्या चार जणांनी बसचा मागचा दरवाजा उघडून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. परंतु ते अपयशी ठरले. त्यामुळे त्यांचा होरपळून मृत्यू झाला. यातील जखमींवर रुबी क्लिनिकमध्ये उपचार सुरू आहेत.
उपायुक्त गायकवाड म्हणाले की, चालक जनार्दन हंबर्डीकरचा बसमधून प्रवास करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी पूर्वी वाद झाला होता. मालकाने त्याचा एक-दोन-महिन्याचा पगार थकवला होता. दिवाळीचा बोनसही न दिल्याचा राग त्याच्या मनात होता. त्याचसोबत चालकाची कामे सोडून त्याला मजुराची कामे करावी लागत होती. एकदा त्याला जेवणाच्या ताटावरून उठवण्यात आले होते. त्यामुळे त्याने बसमधील सर्वांना जाळून मारण्याचा कट रचला.
जनार्दन हुंबर्डीकर यांच्या पत्नी नेहा हुंबर्डीकर यांनी मात्र हे आरोप नाकारले आहेत. त्या म्हणाल्या की, त्यांना सध्या बोलायला येत नाही. हात-पाय हलवता येत नाहीत. तर ते कबुली कशी देतील? त्यांनी कंपनीतून केमिकल चोरल्याचे म्हणत आहेत. ते तसे करताना कुणी बघितले कसे नाही? त्यांना कुणी काही बोलले कसे नाही? आता त्यांना चपाती दिली नाही म्हणून त्यांनी संतापून बसला आग लावली असेही म्हणत आहेत. पण चपाती दिली नाही म्हणून कोण असे करील का? त्यांच्यावरील सगळे आरोप खोटे आहेत. जनार्दनचे भाऊ विजय हुंबर्डीकर यांनीही म्हटले की, माझ्या बायकोचे नातेवाईकही बसमध्ये होते. बसचे सगळे दरवाजे बंद होते, तर तीन जण कसे बाहेर आले? माझ्या भावाला यात गोवण्यात आले आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सुभाष भोसलेचे भाऊ विलास भोसले म्हणाले की, माझा भाऊ कंपनीत कटरचे काम करत होता. त्या दिवशी नेमके काय झाले ठाऊक नाही. परंतु ड्रायव्हर हुंबर्डीकरने केलेली ही हत्याच आहे. कंपनीने त्याला पगार दिला नाही म्हणून त्याने कर्मचाऱ्यांना जाळायची गरज नव्हती. मालकाची गाडी किंवा कंपनी पेटवून द्यायला हवी होती. कामगारांचा यात काही दोष नव्हता. हुंबर्डीकरला फाशीच व्हायला हवी.
व्योमा ग्राफिक्स कंपनीचे मालक नितेश शहा यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यांनी सांगितले की, आम्हाला या घटनेचा जबरदस्त धक्का बसला आहे. आम्ही पोलिसांना पूर्ण सहकार्य करत आहोत. आम्ही जखमींना वैद्यकीय मदत दिली आहे. आम्ही कामगारांचा एक पैशाचाही पगार थकवलेला नाही. केमिकल कंपनीच्या बाहेर कसे गेले याची आम्हाला माहिती नाही.