जळगाव- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज जळगाव येथे केंद्र सरकारच्या ‘लखपती दीदी’ योजनेचा सन्मान सोहळा पार पडला. या सोहळ्यात पंतप्रधान मोदी यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचीच सुरुवात केली. ते म्हणाले की, महाराष्ट्राला पुढची अनेक वर्षे महायुतीच्या सरकारची गरज आहे. महायुतीचे सरकार म्हणजे गुंतवणूक आणि नोकरीची गॅरंटी आहे. हे सरकार गुंतवणुकीला प्राधान्य देईल, नोकरीची संधी देईल आणि महिलांना सशक्त बनवेल. त्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे की, महाराष्ट्राच्या स्थैर्य आणि समृद्धीसाठी माता भगिनी पुन्हा एकदा महायुती सरकारला साथ देतील. महायुती सरकारच्या कामाला भारत सरकारकडून पूर्ण मदत करण्याचे आश्वासन आम्ही देतो. विशेष म्हणजे महाराष्ट्रात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेचा मोदींनी आपल्या 45 मिनिटांच्या भाषणात एकदाही उल्लेख केला नाही. त्यामुळे मोदी ‘लाडकी बहीण’ योजनेवर नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
पंतप्रधान मोदी यांनी आज महिलांसाठी सुरू केलेल्या सर्व योजनांची माहिती दिली. ते म्हणाले की, महिलांसाठी 2014 पर्यंत 25 हजार कोटी खर्च केले. गेल्या केवळ दहा वर्षांत आमच्या सरकारने 9 लाख कोटी रुपये दिले. महिला आर्थिक सशक्त झाली की, तिचे कुटुंब सशक्त होते. आता महिला ड्रोन चालवून आधुनिक शेतीला मदत करतील. आम्ही पशू संगोपनाचा प्रशिक्षण देऊन पशु सखी तयार करीत आहोत. नैसर्गिक शेतीचे ज्ञान देऊन कृषी सखी तयार होते आहे. मोदींनी केंद्राच्या सर्व भावी योजनाही सांगितल्या. पण लाडकी बहीण योजनेबद्दल काहीच बोलले नाहीत. ही योजना प्रथम सुरू करणारे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आज मंचावर उपस्थित होते. महाराष्ट्राच्या महायुती सरकारचे तिघे लाडके भाऊ मंचावर होते. तरीही ‘लाडकी बहीण’ योजनेचे कौतुक मोदींनी न केल्याने राजकीय वर्तुळात मोदी नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
केंद्र सरकारच्या ‘लखपती दीदी’ योजनेतील लाभार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार आणि केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान उपस्थित होते. यावेळी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला मोदी यांनी उपस्थितांना मराठीतून श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर बोलताना ते म्हणाले की, लखपती दीदी ही योजना परिवार आणि येणाऱ्या पिढ्यांना सशक्त करणारी योजना आहे. या योजनेमुळे गावाचे अर्थकारण बदलेल. बचत गटाच्या माध्यमातून जोडलेल्या लाखो महिलांना आज 6 हजार करोड रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे महिलांना लखपती दीदी बनवण्यास मदत मिळेल. महिलांचे उत्पन्न वाढणार असल्याने कुटुंबाचे भाग्य बदलणार असून, घराघरात महिलांचा अधिकार, सन्मान वाढणार आहे. एक महिला लखपती झाली तर पूर्ण परिवाराचे भाग्य बदलते. आतापर्यंत 1 करोड लखपती दीदी बनल्या आहेत. गेल्या दोन महिन्यांत 11 लाख लखपती दीदी बनल्या आहेत. 3 कोटी लखपती दीदी बनवण्याचा सरकारचा संकल्प आहे.
मोदी आपल्या भाषणात महाराष्ट्राची प्रशंसा करताना म्हणाले की, तुमच्यात मला महाराष्ट्राच्या संस्कृतीची आणि संस्काराचे दर्शन होत आहे. पोलंड येथे गेलो असता तेथील राजधानीत कोल्हापूरचे स्मृतिस्थळ आहे. त्यामधून येथील संस्कृतीचे दर्शन झाले. महाराष्ट्रातील मातृशक्तीचे योगदान मोठे राहिले आहे. जिजाऊ मातांनी छत्रपती शिवाजी महाराजांना दिशा देण्याचे काम केले. तर मुलींच्या शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले पुढे आल्या. देश विकसित होत असताना त्यात महिलांचा वाटा मोठा आहे. इथे जमलेल्या महिलांमध्ये मला जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांची छाप दिसते.
सध्या महाराष्ट्रात चर्चेत असलेल्या महिला अत्याचाराच्या मुद्यावरही मोदींनी भाष्य केले. ते म्हणाले की, महिलांवर अत्याचार अक्षम्य अपराध आहे. तो करणारा कोणीही सुटता कामा नये. महिलांची सुरक्षा ही सरकारची प्राथमिकता असून, महिलांवर अत्याचार करणे हे अक्षम्य पाप आहे. असे पाप करणाऱ्यांवर कडक कारवाई करा. तो करणारा कोणीही सुटता कामा नये. पोलीस आणि कुठल्याही स्तरावर कारवाई झाली पाहिजे. सरकार येतील अन् जातील, पण नारीशक्तीकडे लक्ष दिले पाहिजे. महिलांच्या रक्षणासाठी कायदे कठोर केले जात आहेत. पूर्वी एफआयआर नोंदवला जात नाही, वेळ लागतो अशा अडचणी येत होत्या. मात्र आता अनेक अडचणी आम्ही नव्या न्याय संहितामधून दूर केल्या आहेत. ई-एफआयआर सुरू केली आहे. त्यामुळे महिलांना घरी बसून तक्रार करता येईल. त्यात गडबडही होणार नाही. आता जलद प्रतिसाद मिळेल. लग्नाच्या नावे फसवणूक होत होती. त्याबाबतही कायदा केला आहे. महिलांच्या समस्यांसाठी केंद्र सरकार हे राज्य सरकारच्या सोबत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या
दौऱ्याला मविआचा विरोध
छ. संभाजीनगर – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जळगावला जाण्यासाठी छत्रपती संभाजीनगर विमानतळावर येऊन जळगावकडे ज्या मार्गाने जाणार होते त्या मार्गावर आज मविआने आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेस शहर अध्यक्ष युसूफ शेख यासह महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी बदलापूर घटनेच्या निषेधार्थ व राज्यात महिलांवर सतत होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात मातोश्री लॉन्स ते चिकलठाणा विमानतळापर्यंत ‘जवाब दो’ आंदोलन केले. काळे कपडे घालून फलक हाती घेऊन घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. काही वेळानंतर पोलिसांनी अंबादास दानवेंसह मविआच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले.