ढाका- हिंदूंच्या ५१ शक्तिपीठांपैकी एक मानल्या जाणाऱ्या बांगलादेशातील सतखीरा येथील जशोरेश्वरी मंदिरातील काली देवीचा सोन्या-चांदीचा मुकुट चोरीला गेला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार वर्षांपूर्वी बांगलादेश दौऱ्यादरम्यान देवीला हा मुकूट अर्पण केला होता. हे मंदिर ४०० वर्षे जुने असल्याचे सांगितले जाते.
जशोरेश्वरी मंदिराचे पुजारी पूजेनंतर निघून गेल्यानंतर काही वेळातच गुरुवारी दुपारी सोन्या- चांदीने मढवलेला मुकुट चोरीला गेला.सफाई कर्मचाऱ्यांना नंतर देवीच्या डोक्यावरील मुकुट गायब असल्याचे दिसून आले. पंतप्रधान मोदी यांनी २७ मार्च २०२१ मध्ये बांगला देश दौऱ्यादरम्यान जशोरेश्वरी मंदिराला भेट देऊन पूजा केली.त्यावेळी त्यांनी देवीला हा मुकूट अर्पण केला होता. या मंदिराची पिढ्यानपिढ्या जे कुटुंब देखभाल करत आहे; त्या कुटुंबातील सदस्य ज्योती चट्टोपाध्याय यांनी बांगलादेशातील सांगितले की, देवीचा मुकूट हा सोन्या-चांदीने मढवलेला होता.या मुकूटचोरीच्या घटनेची भारताने गंभीर दखल घेतली आहे. तसेच बांगलादेश सरकारला या प्रकरणाची चौकशी करून चोरीला गेलेला मुकूट परत मिळवून देण्याची विनंती केली आहे.