नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगाम हल्ल्यासंदर्भात आज आपल्या निवासस्थानी आज एक महत्त्वाची बैठक घेतली. या उच्चस्तरीय बैठकीत लष्कराच्या तिन्ही दलांचे प्रमुख, संरक्षण प्रमुख, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार उपस्थित होते. या बैठकीत मोदी यांनी लष्कराला कारवाईचे पूर्ण स्वातंत्र्य दिले. मोदी म्हणाले की, पहलगाम हल्ल्याचे कसे प्रत्युत्तर द्यायचे याची आम्ही ल्ष्कराला पूर्ण मुभा देत आहोत. हल्ल्याचे लक्ष्य, वेळ, पद्धत कुठली असेल, हे लष्कराने ठरवायचे आहे. त्यांना देशाचा पूर्ण पाठिंबा राहील.
पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेली ही बैठक सुमारे दीड तास चालली. या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण प्रमुख अनिल चौहान, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यासह भूदल प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, नौसेना प्रमुख ॲडमिरल दिनेश के. त्रिपाठी आणि वायुसेना एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंग हे उपस्थित होते. या बैठकीत मोदी यांनी
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचा निर्धार व्यक्त केला. पंतप्रधान मोदींनी तिन्ही लष्कर प्रमुखांना सांगितले की, त्यांना दहशतवादाचा सामना करण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य आहे.
पहलगाम हल्ल्याला योग्य उत्तर देणे हा एक राष्ट्रीय संकल्प आहे.
दहशतवादाला उत्तर देणे हा आमचा राष्ट्रीय संकल्प आहे. सैन्याच्या तिन्ही दलांच्या क्षमतेवर देशाचा पूर्ण विश्वास आहे. पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याची कारवाई कुठे, कधी, कशी करायची हे तुम्ही ठरवायची आहे. याचे तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य आहे.
ही बैठक झाल्यावर मोदी यांनी केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा केली. या दोन्ही बैठका होण्याआधी आज केंद्रिय गृह मंत्रालयात राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (एनएसजी), सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) आणि सशस्त्र सीमा दल (एसएसबी) यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तर उद्या सकाळी 11 वाजता केंद्र सरकारची मंत्रिमंडळ बैठक होणार आहे. पहलगाम हल्ल्यानंतर होणारी ही पहिलीच मंत्रिमंडळ बैठक आहे. या बैठकीनंतर उद्या पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय सुरक्षा समिती (सीसीएस)ची बैठक होणार आहे.
पहलगाम हल्ल्याचे प्रत्युत्तर देण्यासाठी दिल्लीत बैठकांचे हे सत्र चालू होते. तर भारतीय गुप्तचर खात्याला अशी धक्कादायक माहिती मिळाली की, पाकिस्तानी दहशतवादी भारतावर पुन्हा एकदा जम्मू काश्मीरमध्येच दुसरा हल्ला करण्याच्या तयारीत
आहेत. यावेळी काश्मिरी पंडित, पोलीस आणि परदेशी नागरिकांना ठार करण्याचा कट रचण्यात आला आहे.
पाकिस्तानची गुप्तचर संस्था इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स (आयएसआय)ने या हल्ल्यांची योजना आखली आहे. परदेशी पर्यटक,
पोलीस आणि काश्मिरी पंडित निशाण्यावर आहेत. या माहितीनंतर काश्मीरमध्ये दहशतवादी हुडकून काढण्याच्या मोहिमेला वेग दिला असून, ज्या भागात त्यांचा शोध सुरू आहे. अशा काश्मीरमधील 80 पैकी 48 पर्यटनस्थळे सरकारने पर्यटकांसाठी बंद केली. रेल्वे पायाभूत सुविधांच्याबाबत सुरक्षेचा अभाव आणि खोऱ्यात बाहेरून आलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांची लक्षणीय उपस्थिती लक्षात घेऊन
रेल्वेवर हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असाही इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. त्यानंतर रेल्वे सुरक्षा कर्मचाऱ्यांना त्यांच्या छावण्या आणि बॅरेकच्या बाहेर जाण्याचे टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
सरकारने आता सावधगिरी म्हणून काश्मीरमधील 80 पैकी 48 पर्यटन ठिकाणे पर्यटकांसाठी बंद केली आहेत. त्यात गुरेझ व्हॅली, दूधपथरी, कमान पोस्ट, अहरबाल धबधबा, कमान पोस्ट, नंबलन धबधबा, कोकरनाग, दुक्सम, सिंथन टॉप, अचाबल, बांगस व्हॅली, मार्गन टॉप, वेरीनाग, युसमाग, नौसामैदान, अस्तानपोरा, कौसरनाग, दूडपात्री, रिंगावली तंगमार्ग, हब्बा खातून पॉईंट, उरी कमान चौकी, ईको पार्क खडियार, नंबलन धबधबा आणि कावनार या ठिकाणांचा समावेश आहे. श्रीनगर शहरात मध्यभागी असलेल्या जामिया मशिदीला भेट देण्यासही सरकारने बंदी घातली आहे. गुलमर्ग, सोनमर्ग आणि दाल सरोवर अशी काही लोकप्रिय ठिकाणे पर्यटकांसाठी खुली असली तरी तिथे जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या विशेष ऑपरेशन ग्रुपमधील दहशतवाद विरोधी पथके तैनात करण्यात आली आहेत.
पाकिस्तानकडून भारतावर सायबर हल्ल्याचा धोकाही भारतीय गुप्तचर यंत्रणांनी वर्तवला आहे. गेल्या दोन दिवसांत भारतीय लष्कराची वेबसाईट दोनदा हॅक करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून झाला. पाकिस्तानचे हे प्रयत्न भारतीय तंत्रज्ञान तज्ज्ञांनी हाणून पाडले. त्यानंतर भारताने आज पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचे एक्स हँडल ब्लॉक केले. पहलगाम हल्ल्यानंतर ख्वाजा आसिफ यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये त्यांनी पाकिस्तान बऱ्याच काळापासून दहशतवादी संघटनांना निधी देत असल्याचे कबूल केले होते.
दरम्यान, पहलगाममध्ये हल्ला केलेले दहशतवादी अनंतनागमध्ये लपल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी लष्कर, राष्ट्रीय रायफल्स व निमलष्करी दलाकडून स्थानिकांची मदत घेतली जात आहे. जम्मू-काश्मीर पोलीस यासाठी तंत्रज्ञानाचीही मदत घेत आहेत. पहलगाम हल्ला करणाऱ्या दोन दहशतवाद्यांची नावे अली भाई उर्फ तल्हा आणि हाशीम मुसा उर्फ सुलेमान असल्याची माहिती मिळाली आहे. मुसा हा गेल्या वर्षी 20 ऑक्टोबर रोजी सोनमर्गमध्ये झालेल्या झेड-मोर्ह भुयार स्फोट प्रकरणातील संशयित आहे. तो लष्कर-ए-तोयबाशी संबंधित असून सुरक्षा दलांवर आणि बिगर-काश्मिरींवर हल्ले करण्यासाठी जम्मू आणि काश्मीरमध्ये त्याला पाठवण्यात आले होते. मुसाने ऑक्टोबर 2024 मध्ये गंदरबलमधील गगनगीर येथे हल्ला केला होता. या हल्ल्यात अनेक कामगार आणि एक स्थानिक डॉक्टर ठार झाला होता. मुसा हा पाकिस्तानी लष्करात पॅरा कमांडो होता. त्याच्या सहभागामुळे पाकिस्तान या हल्ल्यात गुंतला असल्याचा भारताचा आरोप सिद्ध होऊ शकणार आहे. दरम्यान पंतप्रधान मोदी उद्याही केंद्रिय दलांची महत्त्वाची बैठक घेणार आहेत.
पहलगाम पीडित कुटुंबियांना
50 लाख आणि सरकारी नोकरी
पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या पीडित कुटुंबियांना 50 लाख रुपयांची आर्थिक मदत आणि कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज राज्य सरकारने जाहीर केला. पीडित कुटुंबातील सदस्यांच्या शिक्षणाची आणि नोकरीची जबाबदारीही राज्य सरकार घेणार आहे. याशिवाय दहशतवादी हल्ल्यातील मृत पुण्यातील संतोष जगदाळे यांच्या मुलीला सरकारी नोकरी देण्याचे आश्वासनही देण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या सुरुवातीला पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मंत्रिमंडळ बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, दहशतवादामुळे ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांच्या परिवाराच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे आहे, असा संदेश देण्याकरता आम्ही हा निर्णय घेतला आहे. सरकारच्या घोषणेनंतर संतोष जगदाळे यांच्या कन्या आसावरी जगदाळे म्हणाल्या, माझ्या वडिलांची इच्छा होती की, सरकारच्या कुठल्या तरी कामात माझे योगदान असावे. त्यांची ती इच्छा पूर्ण होत आहे. मला नोकरीची गरज होती. मी खरोखर सरकारचे आभार मानते. तर जगदाळे यांच्या पत्नी प्रगती म्हणाल्या की, सरकारने माझ्या मुलीला अशी जबाबदारीची पोस्ट द्यावी ज्याद्वारे ती लोकांना मदत करू शकेल.
