मुंबई – पंतप्रधानांची शिवाजी पार्कावरची सभा ऐकल्यानंतर लक्षात येते की ते फार खोटे बोलतात. त्यामुळे त्यांच्यावर आता विश्वास राहिलेला नाही असा आरोप काँग्रेस नेते व महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केला आहे. आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
चेन्नीथला म्हणाले की, मोदी म्हणतात की ठाकरे हे काँग्रेसच्या रिमोटवर चालतात. ही राज्याची निवडणूक आहे. त्यात सर्वच निर्णय महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून घेतले जातात. महायुतीप्रमाणे दिल्लीच्या रिमोटवर आमचे काम चालत नाही. ते अजित पवारांबद्दल बोलले होते की, ते भ्रष्टाचारी आहेत. नंतर त्यांनाच आपल्या बरोबर घेतले. त्यांनी संविधान बदलण्याचा प्रयत्न केला त्याला लोकांनी नाकारले आहे. त्यामुळे मोदी यांनाही इतर लोकांच्या मदतीने सरकार बनवावे लागले. मोदींना महाराष्ट्राशी काहीही देणेघेणे नाही. मुस्लीम उमेदवार व नवाब मलिक यांच्या उमेदवारीमुळे पंतप्रधानांच्या सभेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कोणीही आले नाही. त्यांच्यामध्ये सर्व काही आलबेल नाही हे स्पष्ट झाले आहे.
एका प्रश्नाला उत्तर देतांना त्यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले की अशोक चव्हाण यांना पक्षाने सर्वकाही दिले. मुख्यमंत्रीपद दिले, त्यांना प्रदेशाध्यक्षपद दिले, अनेक महत्त्वाच्या पदावर त्यांची वर्णी लागली होती. असे असतांनाही त्यांनी पक्षाबरोबर गद्दारीच केली .