नवी दिल्ली- भारतीय नौदलात लवकरच २६ समुद्री राफेल विमाने दाखल होणार आहेत. नौदल प्रमुख एडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी ही माहिती दिली आहे. फ्रान्सकडून या २६ विमानांच्या खरेदीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असल्याचेही त्यांनी सांगितले. ते काल नौदल दिनाच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
ते म्हणाले की, या विमानांच्या खरेदीसाठीच्या वाटाघाटी आता अतिम टप्प्यावर आल्या असून पुढच्या महिन्यात या करारावर स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता आहे. राफेल विमानांच्या दराबाबतची बोलणी पूर्ण झाली असून या दरात सरकारकडून मोठी कपात करण्यात आली आहे. २०१६ साली घेण्यात आलेल्या ३६ राफेल जेट विमानांच्या खरेदीच्या धर्तीवरच या वाटाघाटी झाल्या आहेत. या विमानांमुळे भारतीय नौदलाची समुद्रातील व हवेतून मारा करण्याची क्षमता वाढणार आहे. या विमानात भारताकडून आवश्यकतेनुसार अनेक बदल सूचवण्यात आले असून विमानात काही विशेष शस्त्रास्त्रेही बसवण्यात येणार आहेत.