नोबेल शांतता पुरस्काराचे इम्रान खान यांना नामांकन

कराची – सध्या तुरुंगात असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मानवाधिकार आणि लोकशाहीसाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल प्रतिष्ठित नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. त्यांचे नाव पाकिस्तान वर्ल्ड अलायन्स आणि नॉर्वेमधील राजकीय पक्ष सेंट्रम यांच्या पाठिंब्याने पुढे आले.
सेंट्रम पक्षाने सोशल एक्सवर पोस्ट करत माहिती दिली की,नामांकन करण्याचा अधिकार असलेल्या व्यक्तीच्या माध्यमातून आम्ही इम्रान खान यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकित केले आहे.” यापूर्वी २०१९मध्ये देखील त्यांना दक्षिण आशियामध्ये शांतता वाढवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल नोबेल पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आले होते.मात्र त्यावेळी त्यांची निवड झाली नव्हती. नॉर्वेजियन नोबेल समितीला दरवर्षी शेकडो नामांकने मिळतात आणि त्यानंतर ८ महिन्यांच्या प्रक्रियेनंतर विजेत्याची निवड केली जाते. इम्रान खान ऑगस्ट २०२३पासून तुरुंगात आहेत.जानेवारी २०२४ मध्ये त्यांना भ्रष्टाचार आणि अधिकारांचा गैरवापर केल्याच्या प्रकरणात १४ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती.