नेरळ – मागील पाच दिवसांपासून मध्य रेल्वेच्या नेरळ रेल्वे स्थानकातील प्रवाशांच्या सेवेसाठी असलेली लिफ्ट बंद आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. तरी माथेरान येथे येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाने तात्काळ ही लिफ्ट सुरु करावी,अशी मागणी नेरळ रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष संदीप म्हसकर यांनी केली आहे.
नेरळ हे मध्य रेल्वेवरील महत्त्वाचे जंक्शन स्थानक असल्याने या स्थानकातून माथेरान या पर्यटनस्थळी मिनीट्रेन जाते. त्यामुळे देश विदेशातील पर्यटक हे माथेरान येथे जाण्यासाठी नेरळ रेल्वे स्थानकात येत असतात. प्रवाशांचे मोठी गर्दी नेरळ रेल्वे स्थानकात असते आणि त्यासाठी नेरळ स्थानकात प्रवाशांच्या सोयीसाठी लिफ्ट तसेच सरकता जिना बसविण्याची मागणी नेरळ प्रवासी संघटनेकडून सातत्याने होत आहे. सध्या नेरळ स्थानकात फलाट दोनवर असलेली लिफ्ट मागील पाच दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे पावसाळी सुट्टीसाठी येणाऱ्या प्रवाशांना जिन्यावरून चढत जाताना आपल्या बॅगा सांभाळत जावे लागत आहे.तरी ही प्रवाशांची गैरसोय दूर व्हावी यासाठी याठिकाणी असलेली लिफ्ट तत्काळ दुरुस्त करावी आणि मंजूर असलेला सरकता जिना काम त्वरित सुरू करावे अशी मागणीही रेल्वे प्रवासी संघटनेने केली आहे.