नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार शरद पवारांच्या पक्षाला मिळाले तात्पुरते नाव

नवी दिल्ली – शरद पवार यांच्या हातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ गेल्यानंतर आयोगाच्या निर्देशानुसार राज्यसभा निवडणुकीसाठी शरद पवार यांनी दुपारी 4 वाजण्यापूर्वी आयोगाकडे तीन नावांचा पर्याय पाठवला. नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदराव पवार आणि एनसीपी – शरद पवार ही तीन नावे देण्यात आली. यावेळी तीनही नावात ‘शरद पवार’ ठेवण्यात आले. सोनिया गांधी यांना विरोध करीत काँग्रेसमधून फुटून स्वतंत्र पक्ष स्थापन केला तेव्हा शरद पवारांनी असेच स्वतःचे नाव पक्षाच्या नावात जोडत काँग्रेस एस हे नाव घेतले होते. निवडणूक आयोगाने ‘नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार’ असे नाव शरद पवार यांच्या पक्षाला तात्पुरत्या स्वरुपात दिले आहे.
शरद पवार गटाने पाठविलेल्या तीन नावांपैकी आयोग जे नाव निवडेल ते राज्यसभा निवडणूक संपेपर्यंत 27 फेब्रुवारीपर्यंत राहणार आहे. या निवडणुकीसाठी चिन्हाची आवश्यकता नसल्याने निवडणूक आयोगाने शरद पवार गटाकडे चिन्हाचे पर्याय मागितले नव्हते. दरम्यान आयोगाच्या निकालाच्या विरोधात शरद पवार गट सर्वोच्च न्यायालयात जाईल हे लक्षात घेऊन अजित पवारांनी न्यायालयात कॅव्हिएट दाखल केले. नवी दिल्लीत अजित पवारांचे खासदार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी आयोगाच्या निर्णयाची माहिती संसद कार्यालयाला लेखी दिली.
केंद्रात या घडामोडी घडत असताना शरद पवार समर्थकांनी आज मुंबईत ठिकठिकाणी आंदोलने केली. मुंबईसह कर्जत जामखेड, धुळ्यातही आंदोलने झाली. शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी सर्वत्र निवडणूक आयोगाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर शरद पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांचे पोस्टर लावण्यात आले होते. ‘चिन्ह तुम्हारा, बाप हमारा’, ‘वारसा विचारांचा, मार्ग संघर्षाचा’ अशी घोषवाक्ये पोस्टर्सवर लिहिली होती. शरद पवार गटाला प्रत्युत्तर देत अजित पवार समर्थक कार्यकर्तेही राज्यात ठिकठिकाणी जल्लोष करत होते. नाशिक शहर आणि जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने तेथील राष्ट्रवादी भवनासमोर ढोलताशांच्या गजरात काल आनंदोत्सव साजरा केला होता. आजही पक्ष कार्यालयासमोर आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
शरद पवार यांचा मुक्काम अधिवेशनानिमित्त दिल्लीत आहे. निवडणूक आयोगाचा निकाल आल्यानंतर ते काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण शरद पवारांनी त्यांचे नियमित कार्यक्रम सुरू ठेवले. आज दिल्लीतील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान मोदींच्या आजच्या संसदेतील भाषणावर टीका केली. ते म्हणाले की जगात देशाचे नाव उंचावण्यासाठी ज्यांनी काम केले त्या नेत्यांमध्ये जवाहरलाल नेहरूंचे नाव आहे. आज देशात जी लोकशाही आहे, त्याची सुरुवात नेहरूंनी केली. विज्ञान-तंत्रज्ञानाच्या मदतीने देशाचा चेहरामोहरा बदलला. पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सभागृहात नेहरूंवर टीका केली ती देशाच्या दृष्टीने अतिशय चुकीची आहे. वेदना देणारी आहे. कारण पंतप्रधान हे संपूर्ण देशाचे असतात, एका पक्षाचे नसतात. त्यांचे भाषण ऐकून मला दु:ख झाले.
लोकशाहीत आपण आपला अधिकार मजबूत ठेवायचा असतो. जेव्हा चुकीचे काही होत असेल तर त्याला चूक म्हटलेच पाहिजे. चुकीची कामे करणार्‍यांविरोधात लढले पाहिजे, असेही ते एका प्रश्नाच्या उत्तरादाखल म्हणाले. निवडणूक आयोगाच्या निर्णयाबाबत मात्र शरद पवार यावेळी काहीही बोलले नाहीत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top