नीट परीक्षा गैरप्रकाराची आता सीबीआयमार्फत चौकशी होणार

नवी दिल्ली – नीट परीक्षेतील गैरप्रकारांवरून देशभरात वातावरण तापल्याने खडबडून जागे झालेल्या केंद्र सरकारने एका पाठोपाठ एक निर्णय घेण्याचा सपाटा लावला आहे. काल या प्रकाराची चौकशी करण्यासाठी तज्ज्ञांची एक उच्चस्तरीय चौकशी सरकारने नेमण्याची घोषणा केली.पेपरफुटी प्रतिबंधक कायदाही लागू केला. त्यानंतर रात्री उशिरा एनटीएच्या अध्यक्षपदावरून सुबोधकुमार यांची उचलबांगडी केली. त्याला एक दिवस उलटत नाही तोच आज नीट घोटाळ्याचा सीबीआयमार्फत तपास करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला. नीट (यूजी) परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे प्रथमदर्शनी आढळून आल्याचे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने मान्य केले असून, या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपविण्याची घोषणा केली.
राष्ट्रीय चाचणी संस्थेमार्फत (एनटीए) नीट ही स्पर्धा परीक्षा घेतली जाते. यावर्षी एनटीएने 5 मे रोजी नीट – यूजी परीक्षा घेतली होती. या परीक्षेत अनेक गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी आल्या होत्या. संपूर्ण देशभरात यावरून सध्या मोठा गदारोळ सुरू आहे. सुरुवातीला असा काही गैरप्रकार झालाच नाही असे म्हणणार्‍या केंद्र सरकारने आता मात्र ही बाब गांभीर्याने घेतली आहे. नीट परीक्षेबाबतच्या तक्रारींची शहानिशा केल्यानंतर या तक्रारींमध्ये प्रथमदर्शनी तथ्य आढळल्याने याप्रकरणीचा तपास सीबीआयकडे सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला, असे शिक्षण मंत्रालयाने प्रसृत केलेल्या प्रसिध्दी पत्रकामध्ये म्हटले आहे. केंद्र सरकारने लागू केलेल्या पेपरफुटी प्रतिबंधक कायद्यामध्ये परीक्षेमध्ये गैरव्यवहार करणार्‍यांना कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. 3 ते 5 वर्षे कारावास आणि 10 लाखांपर्यंत दंड अशा शिक्षेची तरतूद या कायद्यात आहे.सीबीआय दिल्ली युनिटने लगेचच कलम 420 आणि 120 ब अंतर्गत या प्रकरणी पहिला एफआयआर दाखल केला.

लातूरवरही संशय
नीट पेपर लीक प्रकरणी लातूरमध्ये खासगी कोचिंग चालवणार्‍या संजय जाधव आणि जलील पठाण या शिक्षकांना नांदेडच्या एटीएसने ताब्यात घेतले होते. हे दोघेही लातूरमध्ये खासगी कोचिंग क्लासेस चालवतात. परंतु त्यांची चौकशी केल्यानंतर काहीच चुकीचे न आढळल्याने त्यांना सोडून देण्यात आले. मात्र लातूरवर संशयाची सुई कायम आहे. कारण नीट परीक्षेच्या तयारीसाठी राज्यभरातून हजारो विद्यार्थी लातूरमध्ये येतात. त्यामुळे नीट परीक्षेच्या पेपर फुटीचे धागेदारे लातूरपर्यंत पोहोचले असतील, असा एटीएसला संशय आहे. त्यामुळेच एटीएसची लातूर येथील क्लासेसवर करडी नजर आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top