मुंबई – हरियाणा आणि जम्मू-काश्मीरसोबत झारखंड आणि महाराष्ट्रातही विधानसभा निवडणुका घ्यायला हव्या होत्या. पण निवडणूक आयोगाने त्या जाणीवपूर्वक लांबणीवर टाकल्या.याचा अर्थ निवडणूक आयोगालाही यांनी खोके दिले का,असा बोचरा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज केला.
ते पुढे म्हणाले की वन नेशन, वन इलेक्शनच्या बाता मारतात. पण चार राज्यांतील विधानसभा निवडणुका त्यांना एकत्र घ्यायच्या नाहीत. महाराष्ट्रात जशी दोन पक्षांत फोडाफोडी केली तशी झारखंडमध्ये करायची आहे .महाराष्ट्राची तिजोरी रिकामी करायची आहे . त्यासाठीच झारखंड आणि महाराष्ट्राच्या निवडणुका लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत,असा आरोप राऊत यांनी केला.
काल मीडियामध्ये जाहीर झालेल्या एका जनमत चाचणीचे निष्कर्षही राऊत यांनी फेटाळून लावले.’या जनमत चाचण्या लोकांची दिशाभूल करण्यासाठी पसरविल्या जातात. याच लोकांनी लोकसभेत भाजपाला ३५० जागा मिळतील असे भाकीत केले होते. त्याचे काय झाले हे सर्वांनी पाहिले आहे’,असे राऊत म्हणाले.