निवडणूक आचारसंहितेमुळे ’लाडकी बहीण’ला स्थगिती

मुंबई – महायुती सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा फटका बसला आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेमुळे सरकारला या योजनेच्या निधीचे वितरण थांबवावे लागले आहे. यामुळे लाडक्या बहणींच्या खात्यात दिवाळीत पैसे जमा होणार नाहीत. याशिवाय दिवाळीनिमित्त देण्यात येणार्या ‘आनंदाचा शिधा’चे वाटपही होणार नाही.
आतापर्यंत लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2 कोटी 50 लाखांहून अधिक पात्र महिलांना नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे पाच महिन्यांचे हप्ते प्राप्त झाले आहेत. या योजनेसाठी 46 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. मात्र, राज्यात 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा मतदान होणार असल्यामुळे निवडणूक आयोगाने आचारसंहितेच्या काळात मतदारांवर थेट प्रभाव टाकणार्‍या आर्थिक योजना बंद करण्याची सूचना राज्य सरकारला केली आहे. त्यानुसार, महिला व बालकल्याण विभागाने लाडकी बहीण योजनेला दिला जाणारा निधी थांबवला आहे. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे पात्र महिला लाभार्थ्यांनामिळणार नाहीत.
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी सरकारच्या सर्व विभागांना आर्थिक लाभ देऊन मतदारांवर थेट प्रभाव टाकणार्‍या योजनांची माहिती विचारली होती. महिला व बालकल्याण विभागाकडून लाडकी बहीण योजनेंतर्गत मोठा आर्थिक लाभ दिला जात होता. निवडणूक आयोगाने या विभागाकडे यासंबंधीची विचारणा केली असता विभागाने या योजनेला केला जाणारा निधीचा पतपुरवठा चार दिवसांपूर्वीच थांबवण्यात आल्याची माहिती दिली. त्यामुळे ही योजना तात्पुरती स्थगित करण्यात आल्याचे उघड झाले.
लाडकी बहीणप्रमाणेच सरकारमान्य रेशन दुकानातून केशरी रेशन कार्ड धारकांना दिवाळी सणानिमित्त ‘आनंदाचा शिधा’लाही निवडणूक आचारसंहितेमुळे तूर्त ब्रेक लागला आहे. सरकारच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने ‘आनंदाचा शिधा’चे वाटप न करण्याचा निर्णय घेतला आहे. 2022 व 2023 सलग दोन वर्षे सरकारने दिवाळीसणानिमित्त केशरी रेशन कार्डधारकांना शंभर रुपयांत आनंदाचा शिधाचे किट उपलब्ध करून दिले होते. यामध्ये एक किलो साखर, चणा डाळ, मैदा, पोहे, रवा आणि खाद्य पामतेल असे जिन्नस होते. ‘सर्वसामान्य लोकांची दिवाळी गोड’, अशी जाहिरात राज्य सरकारने हे किट देताना केली होती. मात्र, यंदा दिवाळी सणाला आनंदाचा शिधा मिळणार नसल्याने खुल्या बाजारातील चढ्या भावाने हे जिन्नस विकत घेऊन दिवाळीला गोडधोड बनवावे लागणार आहे.