इचलकरंजी- राज्यातील विधानसभा निवडणुका संपताच इचलकरंजीच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या सुळकूड पाणी योजनेचा नेत्यांना विसर पडू लागला आहे. सध्या या योजनेवर कुणीच बोलायला तयार नाही.
माजी पाणी पुरवठा सभापती विठ्ठल चोपडे यांच्या संकल्पनेतून शहरासाठी सुळकूड पाणी योजनेचा आराखडा तयार झाला.त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे योजनेचा डीपीआर मंजूर झाला तर तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी योजनेसाठी १६२ कोटी रूपये निधीही मंजूर केला. यामुळे कोणत्याही परिस्थितीत इचलकरंजीकरांना पुरेसे शुध्द पिण्याचे पाणी मिळणार अशी आशा वाटत होती.मात्र या योजनेमध्ये राजकारण शिरल्यामुळे दुधगंगा काठावरील गावांनी विरोध करण्यास सुरूवात केली आहे.कागलच्या हसन मुश्रीफ आणि समरजीत घाटगे यांनी इचलकरंजीला पाणी देणार नाही अशी भूमिका घेतली आहे.तर स्थानिक नेते खासदार धैर्यशील माने आणि प्रकाश आवाडे हे पाणी येणार एवढेच सांगत आहेत. दिवंगत प्रतापराव होगाडे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेली सर्वपक्षीय कृती समिती सध्या फक्त कागदावर शिल्लक आहे.