मुंबई – मंत्रिपद न मिळाल्याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नाराजी अद्याप संपलेली नाही. अनेक नेते मंत्रिपद न मिळाल्याने नाराज झाले. तर काही आमदार नागपूर अधिवेशन सोडून थेट मतदारसंघात परतले. यामध्ये मागाठाणे मतदारसंघाचे आमदार प्रकाश सुर्वे यांचाही समावेश आहे. ते देखील अधिवेशन सोडून मुंबईला परतले. त्यानंतर समर्थकांनी त्यांच्या कार्यालयाबाहेर मोठी गर्दी केली होती. यावेळी कार्यकर्त्यांनी प्रकाश सुर्वे यांच्या समर्थनार्थ प्रचंड घोषणाबाजी केली. आमदार सुर्वे यांनी मात्र मी नाराज नाही. पण दु:खी आहे, अशी प्रतिक्रिया दिली.
प्रकाश सुर्वे म्हणाले की, मी नाराज नाही, पण दु:खी आहे. मी लढवय्या आणि संघर्ष करणारा कार्यकर्ता आहे. मंत्रिपद मिळाले नाही, याचे प्रचंड दु:ख झाले. ते दु:ख मी लपवले नाही,लपवणार नाही. मी गरीब घरातून आलो आहे. एकनाथ शिंदे देखील गरीब घरातून आले आहेत. त्यांना गरिबीची जाणीव आहे. त्यांना माझे दु:ख कळते. एखाद्याला संधी नाकारल्यानंतर किती दु:ख होते याची जाणीव शिंदेंना आहे. एकनाथ शिंदे यांना संधी मिळाली त्यांनी संधीचे सोने केले. मला देखील संधी मिळाली असती, तर पक्ष वाढीसाठी मेहनत घेऊन, पक्षाला क्रमांक एकवर नेले असते.