नागरी वस्तीतील माकडांचा उच्छादामुळे ठाणेकर हैराण

ठाणे-ठाणे शहराच्या पश्चिमेकडील नितीन कंपनी परिसरातील अटलांटिस इमारतीच्या आसपास गेले काही दिवस माकडांनी हैदोस घातला आहे. माकडांची टोळी कुठल्याही वेळेस येऊन खिडकी वा स्लायडर्स उघडे असल्यास बिनदिक्कत घरात घुसून मिळेल तो पदार्थ फस्त करत आहे. खाण्याचे पदार्थ मिळाले नाहीत, तर सामानाची नासधूस करते. हा परिसर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानापासून काही मिनिटांच्या अंतरावरच आहे. ठाण्याच्या नौपाडा भागातही नागरिकांना या माकडांनी असेच हैराण केले आहे.

ठाणे शहरापासून येऊरचे जंगल जवळच आहे. मात्र आत्तापर्यंत माकडांचा एवढा उपद्रव कधी झाला नसल्याचे नागरिक सांगतात. माकडांचा उच्छाद वाढला की नागरिक अग्निशमन यंत्रणेला फोन करतात. परंतु ‘आम्ही याबाबत काहीच करू शकत नाही तुम्ही वनविभाग वा माकडांच्या टोळीवाल्याना फोन करावा’ असे उत्तर मिळते. वन विभागाला फोन केल्यास आमच्याकडे आता माणसे नाहीत. आल्यावर पाठवतो, असे सांगून फोन कट केला जातो. वनविभागाचा अनुभव चांगला नसल्याच्या अनेक तक्रारी आहेत. वनविभागाच्या कर्मचार्यांना येऊर परीक्षेत्रासतील तक्रारीबाबत विशेष रस असतो, असे म्हटले जाते. शिवाय त्यांच्याकडे नेहमीच मनुष्यबळाची कमी असते, असेही ठाण्याचे नागरिक सांगतात. मुख्यमंत्र्यांच्या शहरासाठी कमी मनुष्यबळाची तक्रार शोभत नाही , असेही काही जण खासगीत बोलताना सांगतात. माकडे हुसकवण्यासाठी वन विभागाने नागरिकांमध्ये जनजागृती केली पाहिजे, मात्र ती होत नसल्याचे मनसे जिल्हा सचिव नैनेश पाटणकर म्हणाले
दरम्यान ठाणे शहराचे रेंज फ़ॉरेस्ट ऑफिसर दिनेश देसले यांच्याशी नवाकाळने संपर्क साधला असता ते म्हणाले की, ठाण्यात प्रत्येक सोसायटी मध्ये साधारण 150 ते 200 कुटुंब राहतात. त्यातले काही माकडांना देव मानून त्यांना फळे खायला देतात सुरुवातीला माकडांबरोबर सेल्फी काढण्याचेही प्रकार झाले. त्यामुळे माकडे इकडे येऊ लागली, आता त्यांचा त्रास होऊ लागल्यावर हुसकावण्याची मागणी होत आहे. पण ठाणे येऊरपासून जवळ असल्याने हा प्रश्न उद्भवतो. आम्ही तक्रार आल्यावर ताबडतोब रेस्क्यू टीम पाठवतो.वनविभाग मदत करत नाही, अशी तक्रार चुकीची असल्याचे देसले म्हणाले.
माकडांचा उच्छाद संपवण्यासाठी आता खासदार नरेश म्हस्के यांनाही आवाहन करण्यात येणार असल्याचे नागरिकांनी सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top