नागपूर – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्यावर यकृताशी संबंधित आजारावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज सकाळी त्यांची तब्येत अचानक खालावली आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. ते ५९ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने शैक्षणिक क्षेत्रात शोककळा पसरली.
मागील आठवड्यात रात्री प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारांसाठी मुंबई येथे नेण्याचा निर्णय निकटवर्तीयांनी घेतला होता. त्यानुसार एअर अॅम्बुलन्स इंडिया या कंपनीशी संपर्क साधून एअर अॅम्ब्युलन्सची नोंदणी करण्यात आली. मात्र वेळेत एअर अॅम्ब्युलन्स न मिळाल्याने त्यांच्यावर नागपूरातील खाजगी रुग्णालयातच उपचार सुरू होता, मात्र यात डॉक्टरांना यश न मिळाल्याने अखेर आज सकाळी त्यांचे निधन झाले. सुभाष चौधरी (जन्म १८ मे १९६५) यांनी स्थापत्य अभियांत्रिकी विषयात पदव्युत्तर पदवी आणि पीएच. डी. प्राप्त केली असून त्यांना अध्यापन, संशोधन तसेच प्रशासन क्षेत्रात व्यापक अनुभव होता. ८ ऑगस्ट २०२० मध्ये त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू पदाची धुरा सांभाळली.