नागपूर – विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी नागपुरात आलेल्या लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी प्रसिद्ध रामजी श्यामजी पोहेवाला येथे जाऊन तर्री पोह्यांचा आस्वाद घेतला. समाज माध्यमांवर सध्या याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
राहुल गांधी काल दुसऱ्यांदा निवडणूक प्रचारासाठी विदर्भाच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी अमरावती जिल्ह्यातील धामणगाव आणि चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे सभा घेतली. दिल्लीला परत जाण्यापूर्वी राहुल गांधी यांनी छत्रपती चौकातील रामजी श्यामजी पोहेवाला येथे नागपुरी पोह्याचा आनंद लुटला. तसेच पोह्याची पाककृतीदेखील जाणून घेतली. यावेळी त्यांनी पोहेवाल्याशी संवाद साधला. त्याची दिवसाला कमाई किती होते, दिवसभरात खर्च किती होतो आणि महिन्याला किती रकमेची बचत होते. याबाबत विचारपूस केली. यावेळी त्यांनी तिथे उपस्थित ग्राहकांशीदेखील संवाद साधला. राहुल गांधी आल्याचे कळताच छत्रपती चौकातील मेट्रो स्टेशनजवळ उभे असलेले अनेक तरुण तिकडे धावत गेले. अनेकांनी राहुल यांच्यासोबत सेल्फी काढला. ते सुमारे पाऊण तास येथे होते.