मुंबई- राज्यभर काल बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद कार्यकर्त्यांनी ‘औरंगजेब कबर हटाव’ अशी घोषणा देत आंदोलन केले. मात्र नागपूरच्या महाल, हंसापुरी आणि इतर भागांत आक्रमक जमावाने प्रचंड हिंसाचार करीत हिंदू लोकांची घरे, दुकाने, गाड्या जाळत अक्षरशः थैमान घातले. मुस्लिमांची दुकाने आधी बंद करायला सांगून मग हिंदुंची दुकाने पेटवली. आज मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन करीत म्हटले की, हा पूर्वनियोजित हल्ला होता. यात पोलिसांवर हल्ला झाला. तीन उपायुक्त जखमी आहेत. त्यातील निकेतन कदमवर कुऱ्हाडीने हल्ला केला. तर अर्चित चांडक यांच्या पायाला दुखापत झाली. जात, धर्म न पाहता या दंगेखोरांवर कडक कारवाई केली जाईल.
तोंडावर कापड बांधून आलेल्या शेकडो दंगेखोरांनी आधी सीसीटीव्ही फोडले. मग हिंदूंच्या घरांवर पेट्रोल बॉम्ब फेकले, हिंदूंच्या गाड्या पेटवल्या, दुकानांची जाळपोळ केली. याप्रकरणाचे आज अधिवेशनात तीव्र पडसाद उमटले. विरोधकांनी विधानपरिषदेत गोंधळ घातला. त्यामुळे 10 मिनिटांसाठी विधानपरिषदेचे कामकाज तहकूब केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेसंदर्भात विधानसभेत निवेदन केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही यासंदर्भात सभागृहात प्रतिक्रिया दिली. त्यावर सडकून टीका करीत उध्दव ठाकरे म्हणाले की नागपूर हा फडणवीस यांचा मतदारसंघ आहे. तिथे संघाचे मुख्यालय आहे. असे असून तिथे हिंदू खतरेमें कसा ? हा पूर्वनियोजित कट होता तर पोलीस काय करत होते ?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत निवेदन देताना म्हणाले की, काल नागपूरमध्ये सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास महाल परिसरात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल कार्यकर्त्यांनी औरंगजेब कबर हटाओ असे नारे देत आंदोलन केले. या आंदोलनावेळी त्यांनी गवताच्या पेंढ्यांची प्रतिकात्मक कबर जाळली. त्यानंतर गणेशपेठ पोलिसांनी या आंदोलकांवर दुपारी तीन वाजताच्या सुमारास गुन्हा दाखल केला. तोपर्यंत सर्व शांत होते. त्यानंतर सायंकाळी अफवा पसरली की प्रतिकात्मक जाळलेल्या कबरीच्या कापडावर धार्मिक मजकूर होता. सायंकाळी नमाजासाठी लोक मशिदीत जमले होते. सायंकाळी नमाज झाल्यानंतर 200 ते 250 लोकांच्या जमावाने गोळा होऊन घोषणा दिल्या. जमावातील लोकांनी आग लावून टाकू अशी हिंसक विधाने केली. त्यामुळे पोलिसांनी बळाचा वापर केला. यादरम्यान बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध तक्रार देण्याची मागणी केल्याने त्यांना गणेशपेठ पोलीस ठाण्यात आमंत्रित केले होते. त्यांची तक्रार ऐकून पोलिसांची कारवाई सुरू होती. त्याचवेळी दुसरीकडे हंसापुरी भागात 200 ते 300 लोकांनी दगडफेक केली. त्यांच्या चेहऱ्यावर कापड बांधले होते. या घटनेत 12 दुचाकींचे नुकसान झाले. काही लोकांवर शस्त्राने हल्ला झाला. भालदारपुरा परिसरात साडेसात वाजताच्या सुमारास 100 लोकांच्या जमावाने पोलिसांवर हल्ला केला. त्यावेळी पोलिसांनी अश्रुधूर व सौम्य बळाचा वापर केला. या घटनेत 33 पोलीस जखमी झाले. त्यामध्ये तीन उपायुक्त दर्जाचे पोलीस अधिकारी आहेत. या घटनेत एक क्रेन, दोन जेसीबी व काही चार चाकी वाहने जाळली. पाच सामान्य नागरिक जखमी असून त्यातील एकावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी तीन गुन्हे गणेश पेठ पोलीस ठाण्यात आणि तहसील पोलीस ठाण्यात दोन असे एकूण पाच गुन्हे दाखल केले आहेत. याशिवाय 11 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू केली आहे. यामध्ये कोतवाली, गणेशपेठ, तहसील, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरानगर आणि कपिलनगर या परिसराचा समावेश आहे. संचारबंदी परिसरात एसआरपीएफच्या पाच तुकड्या तैनात असून राज्याच्या पोलीस महासंचालकांनी आयुक्त व उपायुक्तांची बैठक घेऊन राज्यभर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे निर्देश दिले आहेत.
ते पुढे म्हणाले की, काल सकाळी आंदोलनानंतर परिसरात वातावरण शांत होते. मात्र संध्याकाळी काही लोकांनी जाणीवपूर्वक हा हल्ला केल्याचे निदर्शनास येते. कारण दंगल परिसरात जवळपास एक ट्रॉली भरून दगड मिळाले. इतके दगड कुठून आले ? त्यांच्याकडे शस्त्रदेखील सापडली. हेतूपुरस्सर ठराविक घरे व आस्थापनांना या घटनेत लक्ष्य केले गेले. त्यामुळे निश्चितपणे याप्रकरणात काही लोकांचा सुनियोजित कट आहे. कोणत्याही परिस्थितीत कोणालाही कायदा आणि सुव्यवस्था हाती घेण्याची परवानगी नाही. पोलीस शांतता प्रस्थापित करत असतांना त्यांच्यावर झालेला हल्ला अतिशय चुकीचा आहे. छावा चित्रपटाने छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास आपल्यासमोर आणला. त्यानंतर राज्यामध्ये लोकांच्या मनातील औरंगजेबाबद्दलचा राग मोठ्या प्रमाणात व्यक्त होत आहे . परंतु नागपुरातील आणि महाराष्ट्रातील जनतेला संयम ठेवण्याची विनंती आहे.
फडणवीस यांनी निवेदन केल्यानंतरही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही निवेदन म्हणाले की, जे लोक औरंग्याच्या समर्थनासाठी पुढे येतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर राज्य सरकार काम करते. मुख्यमंत्री असताना अडीच वर्षात अनेक कल्याणकारी योजना राबवल्यामुळेच जनतेने अभूतपूर्व विजय मिळवून दिला. दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई केली जाईल. नागपूरमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे.
नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज म्हणाले की, नागपूर शहरात शांतता राखण्यासाठी सोशल मीडिया अकाउंटवर ज्या चुकीच्या बातम्या, अफवा पसरल्या जातात. त्यावर आमचे लक्ष आहे. प्रत्येक सोशल मीडिया अकाउंटला आम्ही ट्रॅक करत आहोत. अफवा कोणी पसरवली त्याचा शोध सुरु आहे. तणावपूर्ण परिसरात संचारबंदी लावली आहे. याठिकाणी हिंदू- मुस्लिम सर्व एकत्रित राहतात. नागपूरमध्ये कधीही अशी घटना यापूर्वी घडली नाही. पण ज्या समाज कंटकाने जाणीवपूर्वक घटना घडवली आहे. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्यांचे कुणी समर्थन करू नये. या घटनेतील आरोपींना अटक करण्याची कारवाई पोलिसांकडून सुरु आहे.
भाजपा आमदार प्रवीण दटके म्हणाले की, या घटनास्थळी पोलीस दीड तास उशिरा पोहचले. त्यामुळे कर्तव्य बजावण्यात कुचराई करणाऱ्यांवर कारवाई करावी. या जाळपोळीसाठी बाहेरून लोकांना आणले होते. हे द्वेषातून केलेले प्लॅनिंग आहे. तर भाजपा नेते अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्री फडणवीस सरकारला बदनाम करण्यासाठी अशा गोष्टी केल्या जात असल्याची प्रतिक्रिया दिली.
ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे सरकारवर टीका करतांना म्हणाले की, जर अफवा पसरल्या होत्या तर त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री कार्यालयातून कोणतीही तत्काळ प्रतिक्रिया का आली नाही. जेव्हा एखाद्या शहरात अशी घटना घडते तेव्हा पहिला संदेश मुख्यमंत्री कार्यालयाला मिळतो. येथे तर मुख्यमंत्री, गृहमंत्री त्याच शहराचे आहेत तरी त्यांना यासंदर्भात पूर्वकल्पना नव्हती? माझा अंदाज आहे की, भाजपाला महाराष्ट्राचे मणिपूर करायचे आहे.
