नांदेडमध्ये चिंतन बैठकीत भाजपा पदाधिकाऱ्यांचा राडा

नांदेड- नांदेड लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार प्रतापराव चिखलीकर यांचा पराभव झाल्यानंतर नांदेडमध्ये आज झालेल्या भाजपाच्या चिंतन बैठकीत पदाधिकाऱ्यांनी एकामेकांवर पराभवाचे खापर फोडत जोरदार गोंधळ घातला. लोकसभा निवडणुकीतील पराभवाचे विश्लेषण करण्यासाठी भाजपा अनेक जिल्ह्यांत चिंतन बैठका घेत आहे. त्यात भाजपा पदाधिकाऱ्यांमधील धुसफूस उघड होत आहे.
सलग १० वर्ष ताब्यात असलेला नांदेड मतदारसंघ हातातून गेल्यामुळे नांदेडमध्ये भाजपाकडून चिंतन बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला महसूलमंत्री राधाकृष्ण पाटील उपस्थित होते. मात्र, चिंतन बैठक सुरू होण्यापूर्वीच भाजपाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चांगलाच राडा झाला. पराभवाला एकमेकांना जबाबदार धरून पदाधिकाऱ्यांची बाचाबाची सुरू झाली. वाद इतका विकोपाला गेला की काही पदाधिकारी एकमेकांना मारण्यासाठी अंगावर धावून गेले. वरिष्ठ नेत्यांनी मध्यस्थी करून हा वाद कसाबसा मिटवला. त्यानंतर चिंतन बैठक सुरू झाली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top