बेलापूर- नवी मुंबईतील बेलापूर पेंधर मार्गावर चालणारी मेट्रो सेवा आज सकाळी सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे काही काळ बंद पडली. सकाळच्या वेळेतच मेट्रो सेवा बंद पडल्याने अनेक प्रवाशांची तारांबळ उडाली.
नवी मुंबई मेट्रोच्या सेंट्रल पार्क स्थानकातील सिग्नल यंत्रणेत सकाळी ८ च्या सुमारास बिघाड झाल्यामुळे ही मेट्रो बंद पडली. या मेट्रोतून हार्बरच्या रेल्वेस्थानकावर जाऊन पुढे मुंबई, ठाण्याला जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा झाला. प्रवासी मेट्रो स्थानकात पोहोचल्यानंतर सुरक्षा रक्षकांकडून त्यांना मेट्रो बंद असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे बससेवेवर ताण आला. त्यातच बसेसही वेळेवर नसल्याने प्रवाशांना अधिक भाडे देऊन रिक्षाने खारघर रेल्वेस्थानक गाठावे लागले. हा तांत्रिक दोष दुरुस्त केल्यानंतर दुपारी अकराच्या सुमारास मेट्रो सेवा पुन्हा सुरु झाली.