नवी मुंबई – स्वच्छता आणि आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी नवी मुंबई महापालिका आणि एलसीएफ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वच्छ नवी मुंबई हाफ मॅरेथॉन २०२४’चे आयोजन करण्यात आले आहे.उद्या रविवार २२ डिसेंबर रोजी पामबीच मार्गावर होणाऱ्या या मॅरेथॉनला नवी मुंबई महापालिका मुख्यालयापासून पहाटे ५.३० वाजता सुरुवात होणार आहे.
धावणे हा उत्तम व्यायाम आहे. शारीरिक तंदुरुस्तीसाठी दररोज धावण्याचा सराव लाभदायक ठरतो, हा आरोग्यदायी विचार जनमानसात रुजविण्यासाठी व त्यासोबतच स्वच्छता आणि आरोग्य यांचा परस्परपूरक संबंध लक्षात घेऊन शहर स्वच्छतेचाही संदेश देण्यासाठी लेट्स सेलिब्रेट फिटनेस या संस्थेच्या सहयोगाने या हाफ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. नवी मुंबई महापालिका मुख्यालयापासून २१ किलोमीटर, १० किलोमीटर आणि पाच किलोमीटर अशा तीन गटांमध्ये ही हाफ मॅरेथॉन होणार आहे. यामध्ये हजारो धावपटूंनी सहभाग नोंदवला आहे. यामुळे शहर स्वच्छतेसाठी व आपल्या आरोग्याप्रति जागरूक असणाऱ्या नवी मुंबईकर नागरिकांनी या स्वच्छ नवी मुंबई हाफ मॅरेथॉनमध्ये मोठ्या संख्येने उत्साही सहभाग घ्यावा आणि शहर स्वच्छतेप्रति आपली सामाजिक बांधिलकी सहभागातून अधोरेखित करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.