भोपाळ – मध्य प्रदेशमध्ये भाजपाने आता नवी मागणी केली आहे. ३१ मार्च पासून सुरू होणाऱ्या नवरात्र उत्सवावेळी मांस आणि अंडी विक्रीची सर्व दुकाने नऊ दिवस पूर्ण बंद ठेवावी अशी त्यांची सरकारकडे मागणी आहे . यामुळे ही दुकाने चालविणाऱ्या मुस्लिम समाजात खळबळ माजली आहे.
मध्यप्रदेशात उघड्यावर मांस विक्री करण्यावर सरकारने बंदी घातली आहे. भाजपाचे मोहन यादव हे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी घेतलेला हा पहिला निर्णय आहे. आता नवरात्रीत बंदी बाबत सरकार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
भाजपा आमदार रामेश्वर शर्मा आणि अभिलाष पांडेय यांनी आधी ही मागणी केली. त्यांचे म्हणणे आहे की हिंदू-मुस्लीम एकोपा राखायचा असेल तर मुस्लिमांनी नवरात्रीचे नऊ दिवस मांसविक्री बंद ठेवली पाहिजे. मुस्लिमांनी हिंदूंच्या सणांचा आदर केला तर हिंदूही मुस्लिमांच्या सणांचा आदर करतील हिंदूंच्या व्रतावेळी त्यांच्या भावना दुखावल्या जाऊ नये असे शर्मा म्हणाले.
शर्मा यांच्या या भूमिकेचे अन्य भाजपा नेते आणि काही हिंदुत्ववादी संघटनांनी जोरदार समर्थन केले. नवरात्रीत मांसविक्री बंद ठेवण्याची लेखी मागणी भारत रक्षा मंच या हिंदुत्ववादी संघटनेने जिल्हाधिकारी कौशलेंद्र विक्रम सिंह यांच्याकडे केली. नवरात्रीचे नऊ दिवस अनेक हिंदू भाविक कडकडीत उपवास करतात. पाणीदेखील पित नाहीत. उघड्यावर टांगलेले मटण पाहून त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात. त्यामुळे नवरात्री उत्सवादरम्यान मांसविक्रीची दुकाने बंद करण्याचे आदेश द्यावेत,अशी मागणी संघटनेने केली. संस्कृती बचाओ मंच या संघटनेचे अध्यक्ष चंद्रशेखर तिवारीदेखील या मागणीच्या समर्थनार्थ मैदानात उतरले.नवरात्रीचे नऊ दिवस मांसविक्री बंद ठेवण्याची मागणी तिवारी यांनी केली. काही नेत्यांनी मागणी केली की मुस्लिमांनी स्वतः ही दुकाने बंद ठेवावी.
काॅंग्रेसने मात्र या मागणीला सक्त विरोध केला आहे. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ता अब्बास हफीज यांनी या मुद्यावरून भाजपावर कडाडून हल्लाबोल केला. ते म्हणाले की हिंदू आणि मुस्लिम धर्मियांमध्ये तेढ निर्माण करून सामाजिक शांतता भंग करण्याचा भाजपाचा हा प्रयत्न आहे,असा आरोप हफीज यांनी केला. मध्य प्रदेश हे गंगा-यमुना संस्कृतीचे पालन करणारे राज्य आहे. येथे धार्मिक कटुतेला मुळीच थारा दिला जाता कामा नये असे हफीज म्हणाले. सर्व धर्मियांनी एकमेकांच्या धार्मिक परंपरांचा , खाद्यसंस्कृतीचा आदर केला पाहिजे. कोणी काय खावे , काय खाऊ नये हे ठरवण्याचा अधिकार सरकारला नाही,असे ठणकावून सांगताना मुस्लिमांनी त्यांच्या पवित्र रमजान महिन्यात दारूची दुकाने बंद ठेवण्याची मागणी केली होती का,असा सवाल हफीज यांनी केला. मुस्लिमांनी दुकाने बंद करण्यास विरोध केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की नऊ दिवस दुकाने बंद ठेवली तर मोठे आर्थिक नुकसान होईल. दुकानाचे भाडे, कर्मचाऱ्यांचे पगार देणे कठीण होईल.
