धूम-4 मध्ये रणबीर कपूरची एंट्री, लवकरच होणार शूटिंगला सुरुवात

धूम ही सर्वात लोकप्रिय बॉलिवूड चित्रपट फ्रेंचाइजीपैकी एक आहे. या फ्रेंचाइजीच्या पहिल्या तीन चित्रपटात  जॉन अब्राहम, हृतिक रोशन आणि आमिर खान या कलाकारांनी मुख्य भूमिका साकारली होती. त्यामुळे धूम-4 मध्ये नक्की कोणता अभिनेता व्हिलनची भूमिका साकारणार, हे जाणून घेण्यास चाहते उत्सुक होते. रिपोर्टनुसार, या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) मुख्य भूमिका साकारू शकतो.

रणबीर कपूर 2025 आणि 2026 मध्ये अनेक बिग-बजेट चित्रपटांसह येत्या काळात प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहेत. सध्या तो रामायण, लव्ह अँड वॉर आणि आणि अॅनिमल पार्क सारख्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. मात्र, आता तो धूम या हिट फ्रँचायझीमध्येही काम करणार असल्याचे समोर आले आहे. रणबीर कपूर धूम-4 (Dhoom 4 Movie) चा भाग असणार आहे.

या चित्रपटातील भूमिकेसाठी रणबीर कपूर (Ranbir Kapoor) मोठ्या प्रमाणावर ट्रान्सफॉर्मेशन करणार असल्याचे सांगितले जाते. तसेच, या चित्रपटात दोन अभिनेत्रींची प्रमुख भूमिका असेल. पुढच्या वर्षी एप्रिल महिन्यात या बहुप्रतिक्षित ऍक्शन चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली जाण्याची शक्यता आहे. एप्रिल 2026 मध्ये या चित्रपटाची शूटिंग सुरू होईल.

साल 2004 मध्ये जॉन अब्राहम, अभिषेक बच्चन आणि उदय चोप्रा या कलाकारांच्या प्रमुख भूमिकेसह धूम फ्रँचायझीला सुरुवात झाली होती. त्यानंतर धूम 2 (2006) मध्ये हृतिक रोशन आणि धूम 3 (2013) मध्ये आमिर खान यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले होते. धूम-3 ने जगभरात 557 कोटी रुपयांची कमाई केली होती.