मुंबई- महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक भेट घेतली. सह्याद्री अतिथीगृहावर त्यांच्यात बंद दाराआड दीड तास चर्चा झाली. या भेटीच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित नव्हते. विशेष म्हणजे, शुक्रवारी अमित महाराष्ट्र दौऱ्यावर आले, तेव्हाही रात्री उशिरा एकनाथ शिंदे यांनी त्यांची एकट्याने भेट घेतली होती. महायुतीत अनेक बाबतीत शिवसेनेला डावलले जात असल्याची तक्रार करण्यासाठी एकनाथ शिंदे अमित शहा यांना भेटले, असे सांगितले जात आहे. या भेटीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महायुतीत धुसफूस नाही, तर सगळे खूश खूश आहेत. तसे असेल तर अमित शहा- शिंदे यांच्यात दीड तास कसली चर्चा झाली, असा प्रश्न विचारला जात आहे.
अमित शहा आज आपला दोन दिवसांचा दौरा आटोपून सकाळी भोपाळला रवाना होणार होते. काल रायगड किल्ल्यावरील कार्यक्रम आटोपून मुंबईत परतलेल्या अमित शहा यांची मुख्यमंत्री अमित शहा आणि एकनाथ शिंदे व अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांबरोबर रात्री बैठक नियोजित होती. नंतर ही बैठक रद्द होऊन ती सकाळी होणार आहे, असे सांगितले गेले. परंतु अमित शहा यांना सकाळी 10 वाजता परतायचे असल्याने सकाळची बैठकही रद्द झाली. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस वर्ध्याला निघून गेले. अजित पवार कालच रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीसाठी साताऱ्याला गेले होते. ते आज बारामतीत होते. त्यामुळे बैठक होणार नाही, हे निश्चित असूनही एकनाथ शिंदे सकाळी नऊ वाजताच्या सुमारास सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचले. त्यानंतर अमित शहा आणि शिंदे यांच्यात दीड तास चर्चा झाली. ही चर्चा संपल्यावर काहीशा विलंबानेच अमित शहा भोपाळला रवाना झाले.
एकनाथ शिंदे हे गेले काही दिवस महायुतीत नाखूश असल्याचे म्हटले जात आहे. खास करून अजित पवार यांच्या अर्थ खात्याकडून शिवसेनेकडे असलेल्या खात्यांना निधी मिळत असल्याची तक्रार आहे. याशिवाय रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात वाद आहे. त्यामुळे पालकमंत्रिपदाचा निर्णय अजूनही झालेला नाही. शिवसेनेच्या फायली अडवून ठेवल्या जात असल्याचीही तक्रार आहे. या सगळ्याबाबत बोलायला एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांची भेट घेतल्याचे म्हटले जात आहे. शिंदेंनी आपल्या तक्रारी सांगितल्यावर अमित शहा यांनी त्यांना समजवल्याची माहिती आहे. राज्यात लवकरच सर्व काही ठीक होईल. महायुतीसाठी तुम्ही जे काही त्याग आणि योगदान दिले आहे, त्याकडे दुर्लक्ष केले जाणार नाही, असे आश्वासन अमित शहा यांनी त्यांना दिल्याचे समजते.
या भेटीबद्दल विचारल्यानंतर एकनाथ शिंदे म्हणाले की, अमित शहा हे महायुतीचे नेते आहेत. ते काल रायगडावर होते आणि आज मुंबईत होते. मी त्यांची सदिच्छा भेट घेतली, यात राजकारण करण्यासारखे काय आहे? ही राजकीय भेट होती असा काही विषय नाही. राज्यात अनेक विकासाची कामे सुरू आहेत, प्रकल्प सुरू आहेत. यासाठी केंद्र आम्हाला मदत करत आहे. पंतप्रधान मदत करत आहेत. गृहमंत्री मदत करत आहेत. त्यामुळे या भेटीत विशेष काही आहे, असे समजण्याची आवश्यकता नाही. काल मी बातम्यांत असे ऐकले की, मी अमित शहांना असे म्हणालो, मग ते तसे म्हणाले. या सगळ्या तुम्ही चालवलेल्या बातम्या आहेत. पण आमच्यात कुठलीही धुसफूस नाही, तर सगळे खूश खूश आहे. आम्ही काम करणारे आहोत. काम करणारे तक्रारींचे रडगाणे कधी गात नाहीत. आम्ही रडणारे नाही, लढणारे आहोत.
अजित पवार यांनी काल साताऱ्यात बोलताना शिवसेनेला राष्ट्रवादीबाबत तक्रारी असल्याचेआरोप फेटाळले होते. ते म्हणाले की, अमित शहा मला याबाबत काही बोललेले नाहीत. ते मुंबईला निघेपर्यंत मी, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे असे सगळे एकत्र त्यांच्याबरोबर होतो. एकनाथ शिंदेंशी आमचे चांगले संबंध आहेत. ते डायरेक्ट अमित शहांकडे तक्रार करणार नाहीत. ते माझ्याकडे किंवा मुख्यमंत्र्यांकडे करतील.
गोगावलेंना शिंदेंचा फोन आला की नाही?
शिंदे-शहा बैठक संपल्यावर शिंदे यांनी महाडचे आमदार आणि मंत्री भरत गोगावले यांना तातडीने मुंबई बोलावले. ते म्हसळा येथे असलेला आपला कार्यक्रम अर्धवट सोडून मुंबईला निघाले. आपल्याला पक्षाच्या कामासाठी मुंबईला बोलावले आहे, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. मात्र संध्याकाळी त्यांनी शिंदेंकडून असा काही फोन आल्याचा इन्कार केला. आपल्याला मुंबईला बोलावलेच नाही. काही जणांनी चुकीची बातमी पसरविली, असे
ते म्हणाले.
