धाराशिवमध्ये दुप्पट पाऊस तरीही धरण कोरडी

धाराशिव – राज्यात अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडल्याने पूरस्थिती निर्माण झाली. अनेक धरणे भरल्याने त्यातील पाणी सोडण्यात आले. मात्र धाराशिव जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून तुरळक व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. जिल्ह्यात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा दुप्पट पाऊस झाला असला तरी देखील जिल्ह्यातील धरण कोरडी पडली आहेत.

जुलै महिन्यात राज्यात पडलेल्या पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले. पावसाळ्याच्या पन्नास दिवसांमध्ये शासनाच्या अहवालानुसार १६७ मिलिमीटर एवढा पाऊस बरसला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा पाऊस दुप्पट असला तरी धाराशिव जिल्ह्यातील धरण मात्र कोरडी आहेत. राज्यात मान्सूनने हजेरी लावून काही भागात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असली तरी धाराशिव जिल्हा मात्र कोरडाच आहे. जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा चांगला पाऊस झाला आहे. तरी देखील अद्यापपर्यंत सीना कोळेगाव, मांजरा, तेरणा ही धरण कोरडी असल्याने बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत आहे. यंदाचा पावसाळा अर्धा झाला तरी परंडा तालुक्यातील सीना धरण अद्यापही भरले नसल्याने धरण भरण्यासाठी दमदार पावसाची प्रतिक्षा आहे.