सिंधुदुर्ग- दोडामार्ग तालुक्यातील हेवाळे गावात जंगली टस्कर (सुळे असलेल्या)हत्तीचा धुमाकूळ सुरू आहे.या हत्तीचा आता लोकवस्तीनाजीक वावर वाढल्याने हेवाळे ग्रामस्थ व शेतकरी भयभीत झाले आहेत.हा हत्ती घरालगतच्या केळी,सुपारी, नारळ तसेच काजू बागायतींमध्ये झाडे मोडून मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहे.
हा हत्ती घराशेजारी येऊन चित्कार करत असल्याने ग्रामस्थांसह पाळीव जनावरेसुद्धा भयभीत होत आहेत. शिवाय ग्रामस्थांना शेत-बागायतीत वावरणेही धोकादायक बनले आहे. काल दोडामार्ग-वीजघर मार्गावर हेवाळे रस्त्यालगतच्या मंदिराजवळ हा हत्ती दिसला होता. हेवाळे गावात या हत्तीचा मुक्त संचार सुरू आहे. थेट लोकवस्तीनजिक येऊन तो धुडगूस घालत आहे. काल गावातील दत्ताराम देसाई यांच्या घरालगतच्या भेडले काही माडांचे आणि एका कारचे मोठे नुकसान केले.