देशात लोकसभेचे 7 टप्प्यांत मतदान ! 4 जूनला मतमोजणी

नवी दिल्ली – निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक आज घोषित केले. देशभरात एकूण 7 टप्प्यांमध्ये मतदान होणार असून, मतदानाचा पहिला टप्पा 19 एप्रिल, दुसरा 26 एप्रिल, तिसरा 7 मे, चौथा 13 मे, पाचवा 20 मे, सहावा 25 मे आणि सातवा टप्पा 1 जूनला पार पडणार. संपूर्ण देशात 4 जून रोजी सातही टप्प्यांची मतमोजणी होणार असल्याचेही त्यांनी घोषित केले. लोकसभा निवडणुकीबरोबर 4 राज्यांतील विधानसभा निवडणुका आणि देशभरात विधानसभेच्या 26 पोटनिवडणुकाही होणार आहेत.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दुपारी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. त्यानुसार देशभरातील एकूण 96.2 कोटी मतदार 10.5 लाख मतदान केंद्रांवर सुमारे 55 लाख इव्हीएम मशीनमध्ये आपले मत नोंदवतील. देशभरात प्रथम मतदान करणार्‍या नवमतदारांची संख्या 1.82 कोटी असून 21.5 कोटी युवा मतदार आहेत. देशात 47.2 कोटी महिला मतदार असून 12 राज्यांमध्ये महिला मतदारांची संख्या ही पुरुष मतदारांपेक्षा जास्त आहे. 88.5 लाख दिव्यांग मतदार असून, 48,044 तृतीयपंथीय आहेत. 2.18 लाख मतदार 100 वर्षांपेक्षा अधिक वयाचे आहेत. यावेळी प्रथमच नवमतदारांची नाव नोंदणी करताना जास्तीत जास्त नावे समाविष्ट करण्याच्या उद्देशाने 1 एप्रिल 2014 पर्यंत 18 वर्षे वय पूर्ण होणार्‍या मुलांची नावे यादीत आगाऊ अर्ज भरून आगाऊ नोंदवण्यात आल्याची माहिती राजीव कुमार यांनी दिली.
संपूर्ण निवडणूक प्रक्रिया राबवण्यासाठी 1.5 कोटी निवडणूक व सुरक्षा कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक मतदान केंद्रात पाणी, स्वच्छतागृह, दिव्यांगासाठी व्हीलचेअर व रॅम्प वगैरे सोयी करण्यात आल्या असून, मतदारांच्या जास्तीत जास्त सोयीची दक्षता घेण्यात आली आहे.
मुंबई, ठाण्यात 20 मे रोजी मतदान
महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणुका होणार असून, पहिला टप्पा 19 एप्रिल, दुसरा टप्पा 26 एप्रिल, तिसरा 7 मे, चौथा 13 मे, पाचवा 20 मे असा असेल. 2019 च्या निवडणुकीत महाराष्ट्रात 4 टप्प्यांत मतदान झाले होते. पहिल्या टप्प्यात शुक्रवार 19 एप्रिल रोजी भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, रामटेक, चिमूर व चंद्रपूर या मतदारसंघात मतदान होईल. दुसर्‍या टप्प्यात शुक्रवार 26 एप्रिल रोजी वर्धा, यवतमाळ, हिंगोली, परभणी, नांदेड, अकोला, बुलढाणा व वाशिम या मतदारसंघात मतदान होणार आहे. तिसर्‍या टप्प्यात मंगळवार 7 मे रोजी रायगड, उस्मानाबाद, लातूर, बारामती, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी सिंधुदुर्ग, कोल्हापूर व हातकणंगले या मतदारसंघात मतदान होईल. चौथ्या टप्प्यात सोमवार 13 मे रोजी नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड मतदारसंघात मतदान पार पडेल. धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे आणि मुंबईच्या सर्व सहा मतदारसंघांत पाचव्या व शेवटच्या टप्प्यात सोमवार 20 मे रोजी मतदान होईल.
लोकसभा, विधानसभा
निवडणुका प्रथमच एकत्र

यंदा प्रथमच देशातील 4 राज्यांमधील विधानसभेच्या निवडणुका लोकसभेबरोबरच होणार आहेत. सिक्कीम 19 एप्रिल, अरुणाचल प्रदेश 19 एप्रिल, आंध्र प्रदेश 13 मे, ओडिशा 20 मे अशा तारखा असून, विधानसभा निवडणुकांची मतमोजणीदेखील 4 जूनलाच होणार आहे. याशिवाय बिहार, गुजरात, हरियाणा, झारखंड, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, तेलंगणा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, राजस्थान, सिक्कीम, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, आंध्र प्रदेश इत्यादी 26 राज्यांमधील विधानसभा पोटनिवडणुकाही लोकसभेबरोबरच होणार आहेत. महाराष्ट्रात अकोल्यातदेखील विधानसभा पोटनिवडणूक होणार आहे. गोवर्धन शर्मा यांच्या निधनाने अकोल्याची ही जागा रिकामी झाली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top