नवी दिल्ली- भारताची परकीय गंगाजळी सातत्याने कमी होत चालली आहे.गेल्या काही आठवड्यांपासून भारताचे विदेशी चलन भांडार घटत चालले आहे.
भारताची परकीय गंगाजळी १५ नोव्हेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात १७.७६ अब्ज अमेरिकन डॉलरने घसरून ६५७.८९२ अब्ज डॉलरवर आली,असे भारतीय रिझर्व्ह बॅंकेने काल सांगितले. ८ नोव्हेंबर रोजी संपलेल्या मागील अहवाल आठवड्यात एकूण व गंगाजळी ६.४७७ अब्ज अमेरिकन डॉलरने घसरून ६७५.६५३ अब्ज डॉलर झाली होती.
भारताच्या परकीय गंगाजळीने सप्टेंबरच्या अखेरीस ७०४.८८५ अब्ज अमेरिकन डॉलरचा सार्वकालिक उच्चांक गाठला होता.मात्र आता अनेक आठवड्यांपासून घसरत आहे.त्यात रुपयाही दबावाखाली चालला होता. १५ नोव्हेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात गंगाजळीचा एक प्रमुख घटक विदेशी चलन मालमत्ता १५.५४८ अब्ज डॉलरने घटून ५६९.८३५ अब्ज डॉलर झाली.रिझर्व्ह बॅंकेने सांगितले की,आठवडाभरात सोन्याचा साठा २.०६८ अब्ज डॉलरने घटून ६५.७४६ अब्ज डॉलर झाला.तर स्पेशल ड्रॉइंग राइट्स ९४ दशलक्ष अमेरिकन डॉलरने कमी होऊन १८.०६४ अब्ज डॉलर झाले आहेत. तसेच आयएमएफमधील भारताची राखीव स्थिती देखील अहवालाच्या आठवड्यात ५१ दशलक्ष अमेरिकन डॉलरने घसरून ४.२४७ अब्ज डॉलर झाली आहे.