बीड- मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना अत्यंत निर्घृण मारहाण करण्यात आली. या असह्य मारहाणीचा मानसिक शॉक बसून त्यांचा मृत्यू झाला. गॅसचा पाईप, गाडीच्या वायरचा चाबूक, लाकडी बांबू आणि लोखंडी पाईप अशा चार जीवघेण्या शस्त्रांनी त्यांना इतकी मारहाण केली की पाईपचे 15 तुकडे झाले. त्यांच्या शरीरावर 150 व्रण आणि 56 जखमा होत्या. त्यांना मारहाण करण्यासाठी वापरलेल्या हत्यारांच्या परीक्षण अहवालात ही भयानक माहिती उघड झाली आहे. हा नवा अहवाल नुकतीच न्यायालयात सादर झाला आहे. या अहवालातून पुन्हा एकदा हल्लेखोर क्रूर होते हे सिद्ध झाले आहे.
ज्या शस्त्रांनी संतोष देशमुख यांना मारहाण झाली त्याने जीव जाऊ शकतो, असे या अहवालामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. हा अहवाल अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
9 डिसेंबर 2024 रोजीच्या संतोष देशमुख अपहरण आणि हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवले होते. या हत्येचा आरोप असलेल्या वाल्मिक कराडसह 8 जणांवर सध्या खटला चालू आहे. या प्रकरणात सीआयडीने गेल्या महिन्यात 1,200 हून अधिक पानांचे आरोपपत्र बीड न्यायालयात सादर केले आहे. या प्रकरणात वापरलेल्या हत्यारांच्या परीक्षण अहवालातील माहिती आता बाहेर आली आहे. वाल्मिक कराड यांच्या टोळीने गॅसचा पाईप, गाडीच्या क्लच वायरपासून बनवलेला चाबूक, लाकडी बांबू आणि लोखंडी पाईप या चार शस्त्रांनी देशमुखांना जीवघेणी मारहाण केली. ही शस्त्रे वाल्मिक कराड टोळीने खास तयार केली होती. यापूर्वीही त्यांनी इतर मारहाण प्रकरणांत या प्रकारच्या शस्त्रांचा वापर केला होता. देशमुखांच्या पाठीसह छाती, हात, पाय आणि चेहऱ्यावर वार करण्यात आले. त्यांच्या फुफ्फुसालाही इजा झाली होती, असेही या अहवालात म्हटले आहे. ही मारहाण इतकी निर्घृण होती की मारहाणीसाठी वापरलेल्या पाईपचे 15 तुकडे झाले. हे तुकडे घटनास्थळीच सीआयडीच्या हाती लागले होते. पाईपच्या तुकड्यांचे फोटो आणि देशमुख यांच्या पाठीवरील जखमांचा फोटो सीआयडीने आरोपपत्रामध्ये पुरावा म्हणून जोडले आहेत. ही हत्यारे जीवघेणी नसल्याने या प्रकरणातून सहीसलामत सुटका होईल, असा आरोपींचा विचार असावा. परंतु या हत्यारांनी एखाद्याला मारहाण झाली तर त्यात त्याचा मृत्यू होऊ शकतो, असे या अहवालामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. त्यांच्या शवविच्छेदन अहवालात त्यांच्या मृत्यूचा अंतिम निष्कर्ष हॅमरेज अँड शॉक ड्यू टू मल्टिपल इंज्युरीज असा नमूद करण्यात आला आहे. म्हणजे मारहाणीमुळे झालेला रक्तस्त्राव व मानसिक धक्का यामुळे मृत्यू झाला आहे. तपास यंत्रणेकडून आरोपींविरोधात दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात या हत्यारांचे फोटो आणि वैद्यकीय अहवाल जोडण्यात आला आहे. त्यावरून ही हत्या पूर्वनियोजित आणि योजनाबद्ध असल्याचे स्पष्ट होते. हे पुरावे आरोपींवरील गुन्हे भक्कम करण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.
