PM-KISAN YOJANA: केंद्र सरकारद्वारे पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील भागलपूर येथे प्रधान मंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेच्या 19व्या हप्त्याचे वितरण केले.
देशभरातील 9.8 कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांना, ज्यामध्ये 2.41 कोटी महिला शेतकऱ्यांचाही समावेश आहे, या हप्त्याचा लाभ मिळाला आहे. 19व्या हप्त्याच्या माध्यमातून 22,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक आर्थिक मदत थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) द्वारे जमा करण्यात आली.
याआधी महाराष्ट्रातील वाशिम येथून योजनेचा 18वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला होता. पीएम किसान योजनेबद्दल सांगायचे तर फेब्रुवारी 2019 मध्ये ही योजना सुरू करण्यात आली होती.
या योजनेच्या माध्यमातून, जमीनधारक शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी दरवर्षी 6,000 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. ही रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये थेट लाभार्थी हस्तांतरण (DBT) पद्धतीने आधार क्रमांकाशी जोडलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.
लाभार्थ्यांच्या यादीत तुमचे नाव कसे तपासाल?
- PM किसान लाभार्थी यादीत तुमचे नाव आहे की नाही हे चेक करायचे असल्यास www.pmkisan.gov.in वर जा.
- त्यानंतर ‘Beneficiary List’ टॅब निवडा.
- तुमचे राज्य, जिल्हा, तालुका आणि गावाची माहिती भरा
- नंतर ‘Get Report’ वर क्लिक करा.
- आता तुम्हाला यादी स्क्रीनवर दिसेल. त्यात तुमचे नाव तपासा.
Tags – PM-KISAN YOJANA, Gov Scheme