दुर्गा मुख्यमंत्री ……….. नंदिनी सत्पथी, ओडिशा

राज्यातील सर्वोच्चपदी म्हणजे मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसून राज्याचा गाडा हाकण्याचा मान देशातील मोजक्या कर्तृत्त्ववान महिलांना मिळाला. नवरात्रीच्या निमित्ताने या राजकारणातील मुख्यमंत्री राहिलेल्या दुर्गांची ओळख करून देणारी ही अनोखी माळ.

नंदिनी सत्पथी , ओडिशा
वयाच्या आठव्या वर्षांपासून स्वातंत्र्य लढ्यात सहभागी असलेल्या नंदिनी सत्पथी यांना ब्रिटिशांचा युनियन जॅक खाली खेचणे आणि ब्रिटिश सरकारविरोधात पोस्टर चिकटवणे याबद्दल निर्दयपणे मारहाण करण्यात आली होती. पुढे महाविद्यालयीन काळातही राष्ट्रीय युवा आंदोलनाचे नेतृत्व केले होते. या आंदोलनातून सत्पथी यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. पंडित नेहरू पंतप्रधान असताना त्यांनी 1962 मध्ये नंदिनी यांना राज्यसभेवर पाठवले. 1966 मध्ये इंदिरा गांधी भारताच्या पंतप्रधान झाल्यानंतर त्यांना माहिती आणि प्रसारण खात्याचे केंद्रिय मंत्रिपद मिळाले.
6 मार्च 1973 ते 16 डिसेंबर 1976 या काळात त्या ओरिसाच्या मुख्यमंत्री होत्या. आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधींशी मतभेद झाल्याने त्यांनी मुख्यमंत्रिपद सोडले. 1977 च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी त्या जगजीवन राम यांच्या नेतृत्वाखालील विरोधकांच्या गटात सामील झाल्या. हा गट पुढे जनता पक्षात विलीन झाला. नंदिनी जून 1977 मध्ये ढेंकनाल येथून विधानसभेवर निवडून गेल्या. 1980 मध्ये त्यांनी काँग्रेस (उर्स) च्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवून जिंकली. 1985 मध्ये त्या अपक्ष म्हणून निवडणूक जिंकल्या. राजीव गांधींच्या विनंतीवरून सत्पथी 1989 मध्ये काँग्रेस पक्षात परतल्या. मात्र, 2000 मध्ये निवडणूक न लढवता त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. 1977 मध्ये त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होऊन पोलीस चौकशी झाली. मात्र, त्यांनी कुठल्याच प्रश्नाची उत्तरे दिली नाहीत. नंदिनी यांची उत्तम साहित्यिका अशीही ओळख होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top