मुंबई- मयत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची माजी व्यवस्थापक दिशा सालियनला एका गुन्ह्याची माहिती मिळाली होती. यामुळे तिला मानसिक ताण आला. यातून मन हलके करण्यासाठी तिने ती माहिती तिचा जवळचा अभिनेता सुशांत सिंग राजपूतला सांगितली . सुशांतने ती माहिती विश्वासाने त्याची मैत्रीण रिया चक्रवर्तीला दिली. रिया चक्रवर्ती आणि ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांची मैत्री होती. रियाला माहिती कळल्यानंतर दिशा आणि सुशांतचा लागोपाठ 4 दिवसांच्या अंतराने मृत्यू झाला. दोघांच्या मृत्यूबद्दल आजही संशय आहे. दिशा सालियनवर बलात्कार करून तिचा खून केला आणि यात आदित्य ठाकरे व त्यांचे मित्र दोषी आहेत अशी याचिका दिशाच्या वडिलांनी आज उच्च न्यायालयात केली. या 230 पानी याचिकेत त्यांनी दिशा, सुशांत, रिया आणि आदित्य ठाकरे यांचा संबंध कसा होता त्याची ही माहिती दिली आहे.
दिशा सालियन मृत्यू प्रकरण तब्बल पाच वर्षानंतर आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. 8 जून 2020 रोजी तिचा इमारतीवरून पडून जागीच मृत्यू झाला होता. 2021 साली मुंबई पोलिसांनी दिशाने आत्महत्या केली असे म्हणत तिच्या मृत्यूची चौकशी बंद केली होती. त्यानंतर डिसेंबर 2022 मध्ये अधिवेशनात हा विषय उपस्थित झाला तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीसाठी पोलीस आयुक्त राजीव जैन यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करण्यात आली होती. या समितीने अद्याप आपला अहवाल सादर केलेला नाही. त्यानंतर आता 5 वर्षानंतर दिशाच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दिशावर सामूहिक बलात्कार झाला होता. त्यानंतर तिची हत्या करण्यात आली असे याचिकेत म्हटले आहे. तिच्या अंत्यविधीचे फोटोही व्हायरल झाले आहेत. फोटोवरून नवीन वादळ निर्माण झाले आहे. कारण 14 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केलेल्या दिशाचा या फोटोंमध्ये चेहरा स्पष्ट दिसत असून चेहऱ्यावर एकही जखम दिसत नाही. तिच्या शरीरावर जखम नाही. दिशाच्या वडिलांनी यावरून सवाल उपस्थित करत आरोप केले आहेत की 14 व्या मजल्यावरून इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली असेल तर तिच्या चेहऱ्यावर साधे खरचटल्याचे निशाण नाही. तिचा एकही अवयव मोडलेला नाही. ती पडली तिथे रक्ताचा एकही डाग नाही. तिचा शवविच्छेदन अहवाल खोटा आहे. या शवविच्छेदन अहवालाबाबत मुंबई पोलीस ए. पी. नपुंगे यांनी स्टिंग ऑपरेशन केले होते आणि हा अहवाल खोटा असल्याचा खुलासा केला होता. हे सर्व व्हिडियो आणि
पेनड्राइव्ह त्यांनी रिपब्लिकन भारतच्या अर्नब गोस्वामी यांना दिले होते. या सर्व गोष्टीच्या आधारे दिशाचे वडील सतीश सालियन यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे आता पाच वर्षांनंतर पुन्हा या प्रकरणाची चर्चा होत आहे . या प्रकरणावरून राजकीय वातावरण देखील तापले आहे. आज विधानसभेत व विधानपरिषदेत यावरून गदारोळ झाला.
दिशाचे वडील सतीश सालियन यांचे वकील निलेश ओझा म्हणाले की, रिया चक्रवर्ती आणि आदित्य ठाकरे यांचे जुने संबंध आहेत. दिशाच्या मृत्यूनंतर 5 दिवसांनी सुशांतसिंह राजपूत याचाही मृत्यू झाला होता. याच कालावधीत रिया चक्रवर्ती आणि आदित्य ठाकरे यांचे 44 वेळा फोन कॉल झाले होते. दिशा सालियन प्रकरणात डिनो मोरिया आणि सूरज पंचोली यांचाही सहभाग आहे. सीबीआयने आदित्य ठाकरेंना या प्रकरणात क्लीनचीट दिली नाही. दिशाचा मृत्यू पोलिसांनी अपघाती मृत्यू म्हणून नोंद केला होता. अशावेळी पालकांना समोर आणून चौकशी करायची असा नियम आहे, पण तिच्या पालकांना चौकशीसाठी बोलावले नाही. जर ती 14व्या मजल्यावरून पडली तर घटनास्थळी रक्ताचे थेंब असायला हवे होते, पण तिथे तसे काही नव्हते. ज्यांनी तिला रुग्णालयात नेले त्यांच्या देखील कपड्यांवर रक्त नव्हते. 14 व्या मजल्यावर पडूनही तिच्या शरीरावर एकही जखम नव्हती. शवविच्छेदन अहवालात मल्टीपल इंज्युरी आणि डोक्याला मार असेच नमूद केले आहे. तिचा मृतदेह इमारतीच्या गेटबाहेर 25 फुटावर पडला होता. हे प्रकरण तेव्हाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दाबले. त्यानंतर किशोरी पेडणेकर या दिशाच्या पालकांना भेटल्या आणि मुलीची बदनामी होते म्हणून हे सर्व थांबवा असे सांगितले. नारायण राणे आणि नितेश राणे यांना गप्प करण्यासाठी त्यांच्या विरोधात तक्रार करायला लावली. पुरावे असतील तर सादर करा असे त्यांना सांगितले. मुळात जे पुरावे नष्ट केले होते त्याच्या व्यतिरिक्त राणेंकडे काही पुरावे आहेत का, याची त्यांना माहिती हवी होती. जेव्हा मविआचे सरकार गेले आणि शिंदे सरकार आले तेव्हा सप्टेंबर 2023 मध्ये जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली. त्यानंतर शिंदे सरकारने एसआयटीची घोषणा केली. आदित्य ठाकरे, सूरज पांचोली आणि इतर यांच्याविरोधात सामुहिक बलात्कार, खून 376 डी, 302, 120 अशा विविध कलमांखाली गुन्हे दाखल करावे. कस्टडी घेण्यात यावी. त्यांची लाय डिटेक्टर, नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंग टेस्ट घेण्यात यावी. आरोपीला मृत्यूदंड होईल, हे सुनिश्चित करावे ही आमची प्रमुख मागणी आहे. राशिद खान पठाण यांच्या जनहित याचिकेसोबत सतीश सालियन यांची याचिका जोडण्यात यावी. याप्रकरणी 2024 मध्ये राशिद खान पठाण यांनी लेखी तक्रार दिलेली आहे. त्यामुळे याप्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करायला पाहिजे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास करताना समीर वानखेडेंकडे दिशा सालियन प्रकरणातील काही महत्त्वाचे पुरावे सापडले होते. ते हायकोर्टात सादर करण्याचे आदेश देण्याची मागणीही आम्ही कोर्टाकडे केली आहे. याप्रकरणी याचिकाकर्ता म्हणून आम्हाला काही झाले तर त्यासाठी आदित्य ठाकरे आणि गँग जबाबदार असेल.
या याचिकेचे पडसाद आज विधानसभेत उमटले. सत्ताधारी आमदारांनी सभागृहात विषय मांडला आणि गदारोळ घातला. विधानसभेत भाजपा आमदार अमित साटम यांनी म्हटले की, डिसेंबर 2022 मध्ये एसआयटी नेमली होती. या प्रकरणावरून संभ्रमाचे, संशयाचे वातावरण तयार झाले आहे. दिशाचा मृत्यू होण्याआधी पार्टी झाली का, त्यात कोण सामील होते, तिची हत्या झाली का असे प्रश्न उपस्थित होत आहेत. मविआने प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. माजी महापौरांनी भेट घेऊन त्यांची दिशाभूल केली. त्यावेळच्या एका मंत्र्यांचा सहभाग असल्याचा आरोप केला आहे. एसआयटीने काय चौकशी केली, काय निष्कर्ष काढला याची माहिती द्यावी. तत्कालीन मंत्री, दिशाच्या मित्राची चौकशी होणार का, कोठडीत चौकशी होणार का? याची माहिती द्यावी. शिंदे गटाचे अर्जुन खोतकर यांनी म्हटले की, एकदा या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावावा. एकदाची काय ती चौकशी पूर्ण करावी.
गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी उत्तर देत म्हटले की, एसआयटीकडून चौकशी सुरू आहे. अद्याप अहवाल आला नाही. एसआयटीची चौकशी अधिक वेगाने होईल. दिशा सालियन यांच्या वडिलांनी याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्यायालयाने निर्देश दिल्यानंतर पुढील कार्यवाही सरकार करील.
मंत्री नितेश राणे यांनी मागणी केली की सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार बलात्काराचा आरोप झाल्यानंतर तत्काळ अटक करावी लागते. त्यानुसार, आता या प्रकरणातील आरोपीला अटक करावी आणि कायदा सगळ्यांना समान आहे, हे दाखवावे . शिवसेना शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी देखील राणे यांनी केलेल्या मागणीला पाठिंबा दर्शवला आणि आरोप असलेल्यांना अटक करावी अशी मागणी केली. सभागृहात दिशा सालियनच्या मुद्यावर सत्ताधारी आमदार चांगलेच आक्रमक झाले. विधानसभेत घोषणाबाजी करण्यात आली. या गदारोळानंतर विधानसभा अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज 10 मिनिटांसाठी स्थगित केले.
यावर आदित्य ठाकरे म्हणाले की, पाच वर्षे सातत्याने बदनामीचा प्रयत्न होत आहे. हे प्रकरण कोर्टात आहे त्यामुळे न्यायालयातच बोलू. माझ्यावरून सभागृह बंद पाडले जात आहे. पाच वर्षांपासून हेच चालू आहे. पण न्यायालयात जे होईल ते होईल. पाच वर्षापासून मी यावर मुद्द्याचे बोलत आलो आहे आणि बोलत राहणार. अंबादास दानवे प्रतिक्रिया देत म्हणाले की, न्यायालयात याचिका दाखल केली असेल तर न्यायालय योग्य ते निर्देश देतील, योग्य ती भूमिका घेतील. न्यायालयावर आपल्याला विश्वास ठेवावा लागेल. शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रयत्न सातत्याने भाजपाकडून केला जात आहे. आदित्य ठाकरे सालस नेतृत्व आहे, तरुण नेतृत्व आहे. या प्रकरणात राजकारण शिजवले जाते आहे ते ही भाजपाकडून हे मी 100 टक्के म्हणेन.
आदित्य ठाकरेंवर दबाव
आणण्याचा सतत प्रयत्न
दिशा सालियन आणि सुशांत राजपूत यांचा मृत्यू 2020 साली झाल्यानंतर सातत्याने आदित्य ठाकरे यांना यात आरोपी करण्याचा प्रयत्न होत असल्याचे स्पष्ट होते. मात्र पाच वर्षांत हे प्रयत्न सफल झालेले नाहीत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते, त्या तीन वर्षांच्या काळातही आदित्य ठाकरेंवर फक्त आरोप होत राहिले. नारायण राणे व नितेश राणेंनी त्यांच्याकडे पुरावे असल्याचे अनेक पत्रकार परिषदांत सांगितले. मात्र एकही पुरावा उघड केला नाही. दिशाच्या वडिलांनी आता केलेल्या याचिकेतही नवीन कोणताच मुद्दा नाही. त्यामुळे पुन्हा एकदा आदित्य ठाकरे व उद्धव ठाकरेंवर दबाव आणण्याचा हा प्रयत्न असल्याची चर्चा आहे.
सुशांत सिंग घाबरून गाडीत झोपायचा
दिशा सालियनला एका उच्च-प्रोफाइल गुन्ह्याबद्दल माहिती मिळाली होती. दिशा एक अल्पवयीन मुलीच्या अत्याचाराच्या घटनेला साक्षीदार होती, ज्यात प्रभावशाली व्यक्तींचा सहभाग होता. तिला या गुन्ह्याची माहिती असल्याने तिच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. तिने ही माहिती अभिनेता सुशांत सिंग राजपूतला दिली. त्यानंतर सुशांत एक पत्रकार परिषदेत या गुन्ह्यातील लोकांची नावे जाहीर करणार होता. त्यामुळे त्याच्यादेखील जीवाला धोका निर्माण झाला होता. त्याने हे सर्व रिया चक्रवर्तीला सांगितले. कारण सुशांतला विश्वास होता की रिया त्याला मदत करील. परंतु रियाने ही सर्व माहिती आदित्य ठाकरे आणि इतर आरोपींना दिली. त्यानंतर 8 जून 2020 रोजी दिशाचा मृत्यू झाला. त्या नंतर रिया लगेच सुशांतचे घर सोडून गेली. दिशाच्या मृत्युनंतर सुशांत तणावात होता आणि त्याच्या सुरक्षिततेबाबत चिंतीत झाला होता. त्याच्या घरच्या कर्मचाऱ्यांनी ही माहिती दिली. त्याचे कॉल ट्रॅक होऊ नये म्हणून त्याने त्याचे सिमकार्ड वारंवार बदलायला सुरुवात केली होती. त्याने स्वतःच्या बेडरूममध्ये झोपण्याचे टाळले. त्याऐवजी तो त्याच्या गाडीमध्ये झोपत होता. ‘मला देखील ते मारतील’ असे तो त्याच्या घरातील कर्मचाऱ्यांना वारंवार सांगत होता. दिशाच्या मृत्यूनंतर पाच दिवसांत 14 जून 2020 सुशांतचा सुद्धा अत्यंत संशयास्पद परिस्थितीत मृतदेह आढळला. ही सर्व माहिती याचिकेत नमूद केली आहे.
