नवी दिल्ली – दिल्ली मेट्रो रेल्वेची केबल चोरी केल्याप्रकरणी पोलिसांनी ११ जणांच्या टोळीतील चार जणांना अटक केली.
पोलिसांनी केबलची चोरी झालेल्या ठिकाणचे सुमारे पाचशे सीसीटिव्हीतील फुटेज तपासली. त्यातून एक मालवाहू टाटा एस आणि एक होंडा अमेझ गाडी दिसली होती. पोलिसांनी तपास करून या दोन्ही गाडया शोधून काढल्या आणि चार जणांना अटक केली. त्यांच्याकडून चोरीची ५२ मीटर केबल पोलिसांनी जप्त केली.
५ डिसेंबर रोजी मोती नगर आणि किर्ती नगर मेट्रो स्थानकांदरम्यान १४० मीटर सिग्नल केबल चोरी झाल्याचे उघड झाले होते. सिग्नलची केबलच चोरीला गेल्याने त्या दिवशी ब्लू लाईन मेट्रोची वाहतूक दिवसभर विस्कळीत झाली होती. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. अवघ्या सहा दिवसांत तपासाला यश आले.