नवी दिल्ली – राजधानी दिल्ली आणि आसपासच्या भागावर आज दाट धुक्याची चादर पसरली होती . त्यामुळे तापमानाचा पाराही घसरला. दिल्लीत आधीच धुरक्याचे प्रदूषण असताना या हंगामातील पहिल्या दाट धुक्यामुळे दृष्यमानता अधिक घटली.त्याचा दिल्ली तसेच उत्तर भारतात रस्तेमार्ग आणि हवाई वाहतुकीवर परिणाम झाला.
दिल्लीत दृश्यमानता १०० मीटरपर्यंत कमी झाली. दिल्लीच्या पालम विमानतळावरील दृश्यमानता सोमवारी संध्याकाळी सातच्या दरम्यान ९०० मीटर होती. ती रात्री साडेअकराच्या सुमारास ३०० मीटरपर्यंत कमी झाली. तर बुधवारी सकाळी दृष्यमानता १०० मीटरपेक्षाही कमी होती. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात त्याचप्रमाणे,दक्षिण दिल्ली, नेहरुप्लेस, गुरुग्राम व ग्रेटर नोएडा भागातही दाट धुके दिसले.साहजिकच या धुक्यामुळे विमानांच्या उड्डाणांवर व उतरण्यावर परिणाम झाला. काल सकाळी सात विमाने जयपूर आणि लखनौकडे वळविण्यात आली.आग्रा,अमृतसर, हिंडन,पालम,चंडीगड, पठाणकोट येथील विमानतळांवरही कमी दृश्यमानता होती.