नवी दिल्ली – दिल्लीतील वाढते प्रदूषण हा चिंतेचा विषय झाला असून केंद्र सरकारने या संदर्भात लवकरच बैठक घ्यावी, अशी मागणी दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी पत्र लिहून केली आहे. वाढते वायूप्रदूषण रोखण्यासाठी राजधानीत कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी पंतप्रधानांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
गोपाल राय यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, दिल्ली सरकार व आयआयटी कानपूर यांच्यासह सर्व संबंधित केंद्रीय संस्थानी प्रदूषण कमी करण्यासाठी कृती आराखडा तयार करावा. वाऱ्याचा वेग कमी झाल्याने आणि थंडी वाढल्याने धुक्याची चादर तयार होते. ती तोडण्यासाठी कृत्रिम पाऊस पाडण्यात यावा. या बरोबरच दिल्ली सरकारने संबंधित विभागांना ग्रेप ४ च्या निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या तसेच शक्य तो सर्व उपाय योजण्याच्या सूचना दिल्या आहेत. वृद्धांसाठी विशेष काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असून उत्तर भारतातील अनेक शहरांमधील प्रदूषण घातक झाले आहे. दिल्लीतील प्रदूषणामुळे यमुना एक्स्प्रेस महामार्गावर १५ वाहने एकमेकांना धडकली.