दिल्ली – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता दिल्लीतही महाराष्ट्रासारखी लाडकी बहीण योजना लागू होणार आहे. या योजनेला दिल्ली मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यानंतर आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी पक्षाच्या कार्यालयात याची घोषणा करत सांगितले की, या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात दरमहा एक हजार रुपये जमा होणार आहेत. तसेच निवडणुकीत जिंकल्यास दर महिन्याला २,१०० रुपये दिले जातील.
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले, आज मी दोन मोठ्या घोषणा करणार आहे आणि त्या दोन्ही दिल्लीच्या माता-भगिनींसाठी आहेत. आम्ही वचन दिले होते की, आम्ही दर महिन्याला महिलांच्या खात्यात १,००० रुपये जमा करू. आम्ही गेल्या एप्रिलमध्ये याची सुरुवात करणार होतो, पण दुर्दैवाने या लोकांनी मला चुकीच्या प्रकरणात जेलमध्ये पाठवलं. मी ६-७ महिने जेलमध्ये राहिलो आणि बाहेर आल्यानंतर ही योजना राबवण्यासाठी आतिशी यांच्यासोबत काम करत होतो. आज आम्ही घोषणा करत आहोत. उद्यापासून रजिस्ट्रेशन सुरू होईल आणि नंतर पैसे दिले जातील. १८ वर्षांवरील सर्व महिलांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार आहे. विधानसभा निवडणुकीत जिंकल्यानंतर आम्ही महिलांना १००० रुपयांऐवजी दरमहा २,१०० देऊ.
भाजपाचे लोक म्हणतात, पैसा कुठून आणणार? मी त्यांना सांगू इच्छितो की, मी जादूगार आहे, मी हिशेबाचा जादूगार आहे. पैसे कुठून आणायचे, पैसे कुठे वाचवायचे आणि कुठे खर्च करायचे. तुम्ही याची काळजी करू नका, हे मला माहीत आहे.