दादा भुसे आणि थोरवेंची विधान भवनातच धक्काबुक्की शिवसेनेच्या आमदारांची निधीवरून बाचाबाची सुरू

मुंबई – महायुतीतील तीन पक्षांच्या नेत्यांमधील मतभेद वाढत चालल्याचे चित्र गेले काही दिवस दिसत असतानाच आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमधीलच दोन आमदार एकमेकांना भिडले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधान भवनच्या आवारातच मंत्री दादा भुसे आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यामध्ये जोरदार बाचाबाची आणि धक्काबुक्की झाली. भरत गोगावले आणि शंभुराजे देसाई यांच्या मध्यस्थीनंतर दोघे दूर झाले. परंतु सत्ताधारी पक्षातील मंत्री-आमदारच एकमेकांच्या अंगावर धावून जात असल्याने त्यांच्यात आलबेल नाही, हे सगळ्यांना दिसले.
अधिवेशनात सभागृह चालू असतानाच आज सकाळी विधान भवनच्या आवारात कॉरिडॉरमध्ये मंत्री दादा भुसे आणि महेंद्र थोरवे हे एकमेकांशी बोलत होते. अचानक त्यांचा आवाज चढला. महेंद्र थोरवे यांनी त्यांच्या मतदारसंघातील रस्त्याच्या कामासंदर्भात दादा भुसे यांच्याकडे विचारणा केली. आचारसंहिता लागण्यापूर्वी माझ्या मतदारसंघातील काम पूर्ण करून द्या, अशी मागणी आमदार थोरवे यांनी दादा भुसे यांच्याकडे केली होती. दादा भुसे यांना मात्र त्यांचे चढ्या आवाजात वागणे खटकले. महेंद्र थोरवे यांच्या बोलण्याची पद्धत राग आणणारी असल्याचे त्यांना वाटले. त्यावरून दोघांमध्ये आधी बाचाबाची आणि नंतर थेट धक्काबुक्की झाली. यावेळी बरेच आमदार तिथे उपस्थित होते. शंभुराजे देसाई आणि भरत गोगावले यांनी मध्ये पडत दोघांना समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु दादा भुसे आणि महेंद्र थोरवे दोघेही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते. दोघांनी जोरजोरात वाद घालणे चालूच ठेवले. अखेरीस देसाई आणि गोगावले यांनी कसेबसे दोघांना दूर केले.
शिंदे गटातील दोन आमदारांमध्ये हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहामध्ये होते. त्यांना हा प्रकार कळल्यानंतर ते महेंद्र थोरवे आणि दादा भुसे यांना एकत्र घेऊन आपल्या कार्यालयामध्ये गेले. मात्र नंतर शिंदे यांना याबद्दल विचारले असता ते पत्रकारांवरच संतापले. ते म्हणाले की, काहीतरी काय विचारता. अधिवेशनाचा विषय आहे, त्यावर विचारा.
हा वाद झाल्यानंतर शिंदे गटातील आमदार आणि मंत्र्यांकडून वाद झालाच नाहीत, असा दावा करण्यात आला. दादा भुसे सारवासारव करत म्हणाले की, आमदार थोरवे हे माझे सहकारी मित्र आहेत. आमच्यात कुठलाही वाद किंवा धक्काबुक्कीचा कुठलाही प्रकार झालेला नाही. मी आता हा विषय संपवतो. कुणाला सीसीटीव्ही तपासासयचे असतील
तर तपासा.
तर भुसे आणि थोरवे यांच्यात मध्यस्थी करण्यासाठी धावलेले शंभूराज देसाई म्हणाले की, हा वाद झाल्याचा पुरावा काय? बोलताना कोणाचा आवाज वाढला म्हणजे वाद झाला असे नाही. योगायोगाने मी तिथे होतो. मला जेव्हा समजले मोठ्या आवाजामध्ये काहीतरी सुरू आहे तेव्हा मी दोघांनाही तिथून घेऊन गेलो. लॉबीमध्ये गेल्यानंतर आमदार आणि त्यांचा विषय मला सांगितला आणि आमदार साहेबांचे काम कसे मार्गी लावता येईल हे पाहिले. दोघे एकमेकांच्या अंगावर गेले, असे बिलकूल काही घडले नाही. माध्यमांनाही माझी हात जोडून विनंती आहे. माध्यम प्रतिनिधींनीसुद्धा खात्री केल्याशिवाय अशी बातमी चालवणे
योग्य नाही.
मात्र, आमदार महेंद्र थोरवे यांनी जे घडले ते स्पष्टच सांगितले. ते म्हणाले की, मला बाळासाहेबांनी शिकवले आहे, तोंड वाजवून न्याय मिळत नसेल तर तोंडात मारून न्याय मिळवा. दादा भुसे एकदम नकारात्मक मंत्री आहे. माझ्या मतदारसंघातले काम होत नाही हे विचारले तर माझ्यावर आवाज चढवला. या कामासाठी मुख्यमंत्री तसेच श्रीकांत शिंदेंनी फोन केला होता. आमदारांची कामे होत नसतील तर काय करणार? आम्ही शिवसैनिक आहोत स्वाभिमानी आहोत आम्ही सरपंच नाही तर लाखो लोकांचे प्रतिनिधित्व करतो, असे ते म्हणाले.
मंत्री असणारे दादा भुसे यांच्याकडे मी कामानिमित्ताने गेलो होतो. दोन महिन्यांपासून पाठपुरावा करत आहोत. आमदार भरत गोगावले असतील मी स्वतः असेल, आम्ही कामाचा पाठपुरावा करत आहोत. माझ्या मतदारसंघातील कामाबाबत मुख्यमंत्र्यांनी सुद्धा दादा भुसे यांना कॉल करून सांगितलेलं होतं. खासदार श्रीकांत शिंदे साहेबांनी सुद्धा त्यांना कॉल करून सांगितले की काम करून घ्या. परंतु दादा भुसेंनी सांगूनसुद्धा त्यांनी जाणीवपूर्वक काम केले नाही. आज मी त्यांना त्याबाबत विचारले की, दादा बाकीच्या लोकांची कामे झाली. त्यासाठी काल तुम्ही मीटिंग घेतली, पण मी सांगितलेले काम, मुख्यमंत्र्यांनी सांगूनसुद्धा तुम्ही मीटिंगमध्ये घेतले नाही.
मी त्यांना विचारायला गेलो, तर दादा भुसे माझ्यावर चिडून बोलले. मी विचार केला आम्ही स्वाभिमानी आमदार आहोत, आम्ही मुख्यमंत्र्यांबरोबर प्रामाणिकपणे आहोत, तुमच्यावर मुख्यमंत्र्यांनी मंत्री म्हणून जबाबदार दिली आहे. त्यांनी आमदारांची कामे प्रामाणिकपणे केली पाहिजेत. अशा पद्धतीने आम्हाला उत्तर देऊन आम्ही आमचा स्वाभिमान विकणार नाही. त्यामुळे मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की, मी काही तुमच्या घरी खायला येत नाही. तुम्ही मी सांगितलेले काम जे आहे ते जनतेचे काम आहे. मला त्या ठिकाणी काम झाले पाहिजे. माझ्या मतदारसंघातले काम आहे आणि ते काम तुम्ही त्या ठिकाणी करून द्या. परंतु त्यांची बॉडी लँग्वेज आणि पाहण्याचा दृष्टीकोन वेगळ्या पद्धतीचा होता. म्हणून आमच्यात थोडीची शाब्दिक चकमक झाली.
नंतर हा विषय सभागृहातही उपस्थित झाला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका करत म्हटले की, अशी घटना घडत असेल तर ते गंभीर आहे. अध्यक्ष महोदय माहिती घ्या. सीसीटीव्ही फुजेट पाहा. तिथे सर्व पक्षाचे 15-20 आमदार होते . जी फ्री-स्टाईल सुरू होती ती बघत होते.
आतापर्यंत सभागृहात आणि सभाबाहेर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खटके उडण्याचे अनेक प्रकार घडले आहेत. परंतु सत्ताधारी पक्षाचे दोन आमदारच एकमेकांना भिडल्याने शिंदे यांना आगामी निवडणुकीत असे चेहरे घेऊन लोकांसमोर जाणे अवघड
ठरणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top