मुंबई- दादर पूर्व येथील दादर रेल्वे स्थानकालगत 80 वर्ष जुन्या हनुमान मंदिराला रेल्वे प्रशासनाने नोटीस बजावली आहे. या मंदिराच्या विश्वस्त समितीला 4 डिसेंबरला ही नोटीस मिळाली असून त्यात नोटीस प्राप्त झाल्याच्या सात दिवसात हे बेकायदा बांधकाम पाडावे. अन्यथा रेल्वे विभागाकडून मंदिराचे बांधकाम हटवण्यात येईल व त्याचा खर्चही विश्वस्तांकडून वसूल केला जाईल, असे म्हटले आहे. या प्रकरणावर उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सवाल केला. ते म्हणाले, दादर स्टेशन येथील 80 वर्षांचे हनुमान मंदिर पाडण्याची नोटीस केंद्र सरकारच्या अखत्यारीतील रेल्वे विभागाने दिली. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका काय आहे?
मध्य रेल्वेच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 12 जवळ आरपीएफ ऑफिसजवळ हे हनुमान मंदिर आहे. आठ दशकांपूर्वी स्थानकातील हमालांनी या मंदिराची स्थापना केली. याच ठिकाणी साई बाबांचेही छोटे मंदिर आहे. दादर स्थानकातील हमाल आणि हिंदू कॉलनी परिसरातील लाखो भाविकांचे हे मंदिर श्रद्धास्थान आहे. रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी हनुमान मंदिर बांधकाम हटवावे, असे नोटिशीत नमूद आहे. 2018 पासून आतापर्यंत मंदिराला 5 नोटिसा बजावल्या आहेत.मात्र, मंदिर विश्वस्तांनी या नोटिशींना अद्याप उत्तर दिलेले नाही. आता पुन्हा एकदा मंदिराला नोटीस आल्याने भाविकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या.
उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत निवडणुकांच्या तोंडावर हिंदुत्वाचे ढोल बडवणाऱ्या भाजपाने आणि पंतप्रधान मोदी यांनी बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारांबाबत भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहनही केले.
बांगलादेशमध्ये हिंदुंवर अत्याचार सुरू आहेत, हिंदुंची मंदिरे जाळली जात आहेत. इस्कॉनच्या प्रमुखाला अटक झाली. परंतु या सगळ्या मुद्यांवर विश्वगुरु नरेंद्र मोदी एक शब्द बोलायला तयार नाहीत. मणिपूरमधील हिंसाचार त्यांना दिसत नाहीत. मोदी एका फोनवर रशिया -युक्रेन युध्द थांबवू शकतात, मग बांगलादेशमध्ये हिंदुंवर होत असलेला अत्याचार का थांबवू शकत नाहीत, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. तसेच बाकी सर्व मुद्दे बाजुला ठेवून हिंदुत्वाच्या मुद्यावर आपली भूमिका नेमकी काय आहे आणि बांगलादेशमधील हिंदुंना वाचविण्यासाठी सरकार काय पावले उचलणार आहे, हे एकदा जनतेला सांगा, असे आवाहन केले.