मुंबई – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे संकेतस्थळ आहे. मात्र, त्यावर अनेकदा विद्यार्थ्यांना अडचणी येतात. तसेच विद्यार्थी आणि पालकांना दहावी, बारावी परीक्षेचे वेळापत्रक, परीक्षाविषयक माहिती व परिपत्रके यांची माहिती मिळावी, यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मोबाईल अॅप लॉन्च केला आहे. एमएसबीएसएचएसई या नावाच्या अॅपमुळे दरवर्षी बोर्डाच्या परीक्षांबात विद्यार्थ्यांत निर्माण होणारे संभ्रम दूर होणार आहे.
विद्यार्थी, पालक, शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांच्या सोयीसाठी हे अॅप बनवले आहे. यात दहावी, बारावी परीक्षेचेच वेळापत्रक, मार्च २०२४ मध्ये झालेल्या परीक्षेच्या ठराविक विषयांच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात आले आहे. राज्यातील नऊ विभागीय मंडळांची माहिती यात आहे. हे अॅप गुगल प्ले स्टोअरवर एमएसबीएसएचएसई नावाने मोफत उपलब्ध आहे. यात विद्यार्थी, शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना एका क्लिकवर सर्व माहिती उपलब्ध होणार आहे.