दररोज १०० किमी सायकलिंग करणार्या कडसूर यांचे हृदयविकाराने निधन

बंगळुरू –

प्रसिद्ध सायकलपटू अनिल कडसूर यांचे वयाच्या ४५ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अनिल यांनी सलग ४२ महिने दररोज १०० किलोमीटर सायकलिंग करण्याचा विक्रम केला होता. ३१ जानेवारी रोजी अनिल यांनी सोशल मीडियावर हा अनोखा विक्रम पूर्ण केल्याची माहिती दिली होती. मात्र त्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे रुग्णलयात दाखल करण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी त्यांचे निधन झाले.

कडसूर हे मूळचे बंगळुरुचे होते.ऑगस्ट २०२२ मध्ये एका सायकलिंग क्लबने अनिल यांना सलग १० दिवस १०० किलोमीटर सायकल चालवण्याचे आव्हान दिले होते. हे आव्हान त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केले. यानंतर त्यांना दररोज १०० किलोमीटर सायकल चालवण्याचा छंद जडला. सायकल चालवण्याचा एक दशकाहून अधिक अनुभव असलेल्या कडसूर यांनी आतापर्यंत २.२५ लाख किलोमीटरहून अधिक सायकल चालवली आहे. त्यांचा हा अनोखा विक्रम अनेक सायकलस्वारांसाठी मोठी प्रेरणा ठरला आहे. त्यांच्याशी फक्त हस्तांदोलन करणे म्हणजे अनेक लोकांसाठी ऊर्जा आणि सकारात्मकता मिळवण्यासारखे वाटायचे. ते त्यांच्या नम्र स्वभावासाठी ओळखले जायचे. ते नेहमी नवीन सायकलस्वारांना प्रोत्साहन आणि सल्लेही द्यायचे. जवळचे लोक त्यांना ‘द्रोणाचार्य’ म्हणायचे. भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर अनिल कडसूर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, सायकलस्वार अनिल कडसूर यांच्या निधनाबद्दल दु:ख झाले. अनिल हे दररोज १०० किलोमीटरचा सायकल चालवणारे सेंच्युरी रायडर म्हणून ओळखले जायचे. माझ्यासारख्या अनेकांसाठी त्यांची जीवनशैली आदर्श होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top