सेऊल – दक्षिण कोरियामध्ये आज राष्ट्राध्यक्ष यून सुक-सोल यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव मंजूर करण्यात आला. संसदेत त्यांच्या विरोधात २०४ मते पडली, तर त्यांच्या समर्थनार्थ फक्त ८५ मते पडली. संसदेने यून यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव मंजूर केल्यानंतर राष्ट्रपतींचे अधिकार तत्काळ निलंबित करण्यात आले आहेत. आता पंतप्रधान हान डक-सू कार्यवाहक अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळतील.
राष्ट्रपती यून यांनी ३ डिसेंबरच्या रात्री देशात मार्शल लॉ लागू केला. त्याला प्रचंड विरोध झाल्यानंतर त्यांनी २४ तासांतच आपला निर्णय मागे घेतला. त्यानंतर यून यांच्या यांना दक्षिण कोरियात मोठ्या प्रमाणावर विरोध होत होता. गेल्या शनिवारीही त्यांना हटवण्यासाठी महाभियोग प्रस्ताव आणला होता, पण तो पुरेशा मतांनी मंजूर झाला नव्हता.
महाभियोगानंतर हा प्रस्ताव आता न्यायालयासमोर मांडण्यात येणार आहे. ९ पैकी ६ न्यायाधीशांनी राष्ट्रपतींच्या विरोधात निकाल दिला तरच पुढील प्रक्रिया सुरू होईल. महाभियोगानंतर 60 दिवसांच्या आत निवडणुका घ्याव्या लागतात. या काळात राष्ट्रपतींचे अधिकार पंतप्रधानांच्या हातात असतात.