तृणमृलचा खासदार बनल्यावर पठाणला बडोद्यातील भूखंड सोडण्याची नोटीस

बडोदा- तृणमुल कॉंग्रेसचे नविनिर्वाचित खासदार व माजी क्रिकेटपटू युसुफ पठाण यांच्या ताब्यात असलेला बडोदा येथील भूखंड रिकामी करण्याची नोटीस देण्यात आली आहे. नोटीस मिळाल्यापासून १५ दिवसांच्या आत त्यांनी हे अतिक्रमण हटवले नाही तर ते तोडण्यात येईल असेही नोटीशीत म्हटले आहे. मात्र, युसुफ पठाण तृणमुल कॉंग्रेसमधून खासदार झाल्यामुळे त्याच्यावर सुडबुद्धीने ही कारवाई केली असल्याचे म्हटले जात आहे.
बडोदा येथील तांदळजा भागात हा १० हजार ६२३ चौरस फुटाचा भूखंड विकत घेऊन आपल्या घराचा परिसर वाढवण्याची युसुफ पठाण व इरफान पठाण या भावांची इच्छा होती. त्यानुसार त्यांनी मार्च २०१२ मध्ये बडोदा महानगरपालिकेकडे अर्ज केला. पठाण बंधूंना विशेष दराने ही जागा देण्याच्या प्रस्तावाला तत्कालिन महापालिका आयुक्त अश्वीनकुमार यांनी मंजुरी दिली. हा प्रस्ताव ३० मार्च २०१२ रोजी झालेल्या बडोदा महानगरपालिकेच्या स्थायी समितीसमोर चर्चेला आला. ८ जून २०१२ च्या सर्वसाधारण सभेतही त्यावर मंजूरी घेण्यात आली. या भुखंडासाठी ५७,२७० रुपये प्रतिचौरस मिटर असा दर ठरवण्यात आला. त्यानुसार ५ कोटी ६० लाख रुपये भरायला सांगण्यात आले. मात्र, हा प्रस्ताव राज्य सरकारने फेटाळला होता. दरम्यान हा भूखंड पठाण यांच्याच ताब्यात असल्याने त्यांनी त्या जागेवर बांधकामही केलेले आहे. गेल्या १२ वर्षांत या संदर्भात कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. आता युसुफ पठाण हे पश्चिम बंगालमधून खासदार झाल्यानंतर बडोदा महानगरपालिकेने हे प्रकरण पुन्हा उकरून काढले असून त्यांना या जागेवरचे अतिक्रमण हटवण्यास सांगण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top